पुण्यात २०१३ पासून सुरू झालेला ‘पुणे बिएनाल’ हा उपक्रम यंदा, ५ जानेवारी २०१७ पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या खेपेला अधिक मोठा आणि खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय ‘बिएनाल’सारखा होतो आहे. त्या दृष्टीने, या उपक्रमाच्या आधीच्या दोन खेपा झाल्या असल्या तरी यंदाच बिएनालची खरी सुरुवात पुण्यात होते आहे.

बिएनाल, बिएनाले किंवा बायएनिअल म्हणजे दर दोन वर्षांनी भरणारं, चित्र-शिल्प आदी दृश्यकलांवर भर देणारं, पण सर्वच कलांना आणि जगभरच्या कलावंतांना सामावून घेऊ पाहणारं शहरभर पसरलेलं महाप्रदर्शन. जगातल्या २०० हून अधिक छोटय़ामोठय़ा शहरांमध्ये अशी प्रदर्शनं भरतात. व्हेनिसमध्ये दीडशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अशा उपक्रमांवरला पाश्चात्त्य साम्राज्यवादी दाखवेगिरीचा शिक्का ब्राझीलमध्ये १९५७ पासून भरणाऱ्या ‘साओ पावलो बिएनाल’नं पुसून टाकला आणि हल्ली तर हंगेरीतल्या बुडापेस्टपासून ते सिनेगलमधल्या डकार किंवा मोरोक्कोतल्या मराकेश शहरांमध्येही बिएनाल भरतात. त्या सर्व बिएनालेंना आंतरराष्ट्रीय सहभागातून उभारी घेतलेल्या ‘बिएनाले फाऊंडेशन’चे सहयोगी म्हणून प्रतिष्ठा होती आणि आहे. ‘पहिली भारतीय बिएनाल’ म्हणून ओळखली जाणारी ‘कोची-मुझिरिस बिएनाल’ (तिकडला केरळी उच्चार ‘बिनाले’) देखील २०१२ या पहिल्या खेपेच्या वर्षांतही आंतरराष्ट्रीय ‘बिएनाले फाऊंडेशन’च्या सहयोगी यादीत आहे; परंतु भारती विद्यापीठाच्या पुढाकारानं पुण्यात २०१३ पासून सुरू झालेली बिएनाल मात्र या यादीत नव्हती, कारण निराळं आयोजक म्हणून निराळा न्यास स्थापन होऊन तो कार्यरत असावा, ही आंतरराष्ट्रीय बिएनालेंकडून केली जाणारी किमान अपेक्षा पुण्यानं पूर्ण केली नव्हती. मात्र २०१६ च्या महाराष्ट्रदिनी पुणे बिएनालसाठी न्यास-स्थापना झाली, तसंच ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते आणि कोची-मुझिरिस बिएनालेचा यंदाचा विचारनियोजक व ख्यातकीर्त मांडणशिल्पकार सुदर्शन शेट्टी, ‘आर्टइंडिया’ त्रमासिकाच्या संपादकपदाची धुरा गेलं दशकभर सांभाळणारे कलाचिंतक अभय सरदेसाई आदींचा सहभाग असलेलं ‘सल्लागार मंडळ’देखील यंदाच स्थापन झालं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ‘बिएनाले फाऊंडेशन’च्या नकाशावर पुण्याला स्थान मिळण्याच्या तांत्रिक बाजू भक्कम झाल्या आहेत.

मुख्य म्हणजे, याआधी केवळ ‘खुले उपक्रम : नोंदणी करा आणि सहभागी व्हा’ असं स्वरूप असलेल्या या बिएनालेत यंदा प्रथमच, वैचारिक आणि कलात्म नियोजनातून कलावंतांची निवड करणाऱ्या उपक्रमाला (इंग्रजीत, ‘क्युरेटेड प्रोजेक्ट’ला) अग्रस्थान आहे. मुंबईचं राष्ट्रीय कला संग्रहालय, जहांगीर निकल्सन संग्रहालय आदी ठिकाणचा अनुभव घेऊनही नागालँडपासून केरळपर्यंतच्या खरोखर उपेक्षित आणि गुणी कलाकारांचा शोध घेणाऱ्या झाशा कोला आणि झाशा यांचे पती, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्युरेटर ल्युका सेरीझा हे बर्लिनवासी नियोजकद्वय यंदा पुणे बिएनालेतला महत्त्वाचा, जंगली महाराज मार्गाच्या परिसरात ठिकठिकाणी होणारा उपक्रम विचारनियोजित करणार आहे. यंदाच्या बिएनालेसाठी देणग्या मिळवण्याच्या दृष्टीने मुंबईतही पुणे बिएनालेची माहिती देणारा कार्यक्रम शुक्रवारी, २१ ऑक्टोबरला पार पडला.

अर्थात, ‘यंदाच खरी सुरुवात’ हे म्हणणं पुणे बिएनाल उपक्रमाचे २०१३ पासूनचे संकल्पक आणि ‘पुणे बिएनाल फाऊंडेशन’चे व्यवस्थापकीय संचालक किरण शिंदे यांनी खोडून काढलं आहे. ‘‘उपक्रम सुरू झाला, तो लोकांना कलेच्या अधिक जवळ नेण्यासाठी. शहराचं कलेशी नातं पक्कं करण्यासाठी. तेव्हाही काही अभारतीय कलावंत होतेच, पण आम्ही कोणताही मुद्दा केवळ ग्लॅमरचा म्हणून पाहात नाही आणि यापुढेही पाहणार नाही,’’ असं त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितलं.

* झाशा कोला आणि ल्युका सेरीझा यांनी मुंबईतल्या कार्यक्रमात पुणे बिएनालमधल्या यंदाच्या खास प्रकल्पांची माहिती देताना, या प्रदर्शनाचा ‘कॅटलॉग’ इंग्रजीप्रमाणेच मराठीतही आम्ही करू इच्छितो, अशी ग्वाही दिली.

* ‘नाटक कंपनी’ या प्रयोगकला सादर करणाऱ्या समूहाचीही निवड झाशा आणि ल्युका यांनी केली असली, तरी निवडक बारापैकी अन्य सारे कलावंत हे चित्रकार, शिल्पकार किंवा मांडणशिल्पकारच आहेत.

* अमोल पाटील आणि शिल्पा गुप्ता हे मुंबईचे दोन कलावंत यंदा ‘पुणे बिएनाले’च्या निमंत्रित विभागात आहेत, तर स्मिता राजमाने ही पुण्यात आणि दिल्लीत शिकलेली चित्रकर्तीही यंदा निमंत्रित आहे.

* योना फ्रीडमन, मासिमो बातरेलीनी, तोमास सारासेनो, कॅथी विल्क्स, लुइजी ओन्तानी, मारिनेला सेनातोरे आदी परदेशी कलावंत यंदा निवडले गेले आहेत.

* बर्लिनला राहणारा गुणी चित्रकादंबरीकार (ग्राफिक नॉव्हेलिस्ट) सारनाथ बॅनर्जी आणि सिंगापूरला राहणारी शुभिगी राव हे अनिवासी भारतीय कलावंतही पुण्यात येताहेत.

* ५ जानेवारी २०१७ रोजी ‘बालगंधर्व’मध्ये उद्घाटन सोहळा झाल्यावर, हे प्रदर्शन २९ जानेवारीपर्यंत खुलं राहील. तेव्हाच, पुणे आणि महाराष्ट्रातल्या अनेकानेक कलावंतांच्या तसंच कलाप्रेमींच्या सहभागातून साकारलेले पाच अन्य उपक्रमही पुण्यात ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहेत.