बॉलीवूडमध्ये पदार्पण करणे हे काही सोपे काम नसते हे आताच्या आघाडीच्या अभिनेत्यामुळे कळले आहे. चॉकलेट बॉय म्हणून बॉलीवूडमध्ये प्रसिद्धीस आलेला अभिनेता शाहिद कपूरची त्याच्या पहिल्या चित्रपटात निवड होण्यापूर्वी १०० वेळा नकाराला सामोरे गेला होता. ही बाब दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः शाहिदने सर्वांसमोर आणली आहे. गेल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत विविध भूमिका निभावून प्रेक्षकांची मने जिंकणा-या शाहिदने मुलाखतीदरम्यान त्याचे करियर आणि भूमिंकांविषयी चर्चा केली. जर एखादी भूमिका वेगळी, चांगली आणि लोकांवर प्रभाव पाडणारी असेल तर मी त्या भूमिकेच्या लांबीचा विचार न करता लगेच त्यासाठी होकार देईन असे शाहिद यावेळी म्हणाला.
शाहिद म्हणाला की, उडता पंजाब, हैदरमध्ये माझी भूमिका छोटी होती. पण तरीही या चित्रपटांमध्ये मला उत्तम काम करण्याची संधी मिळाली. टॉमी सिंहची भूमिका मला साकारण्यास मिळाली याचा मला आनंद आहे. माझ्या आयुष्यातील एक उत्तम संधी मला त्याद्वारे मिळाली. ज्यात मला वेगळं काही करण्याची संधी मिळते ती प्रत्येक गोष्ट मी निवडतो. पुढे तो म्हणाला की, नवीन गोष्टी शिकत राहण हा आयुष्याचा एक भाग आहे. आपण मागे वळून पाहिल्यावर समोरून येणारं-जाणारं दिसत नाही. त्यामुळे मला केवळ समोरच पाहायचयं. पंकज कपूर यांच्यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असूनही आपल्यासाठी आयुष्य काही सोपे नव्हते असे शाहिदने सांगितले. मला १०० वेळा ऑडिशनमध्ये नाकारण्यात आलं होतं. माझ्याकडे खाण्यासाठीसुद्धा तेव्हा पैसे नसायचे. तर कधी ऑडिशनला जाण्यासाठी पैसे नसायचे, असे आयुष्यही मी जगलोय. मला याविषयी बोलायला आवडत नाही पण हे माझ्या आयुष्यातील सत्य आहे, असेही तो म्हणाला.
आज शाहिदचे आघाडीच्या कलाकारांमध्ये नाव घेतले जाते. आता तर त्याच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. त्याची पत्नी मीरा राजपूत हिने २६ ऑगस्टला एका चिमुकलीला जन्म दिला असून हे दोघे आई-बाबा झाले आहेत.