दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही बॉलिवूड अभिनेत्रींचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. कान फिल्म फेस्टिव्हल म्हटलं की सर्वांचच लक्ष लागून राहतं ते म्हणजे कलाकारांच्या वेशभूषेवर. काही नामांकित डिझायनर्सच्या कलात्मक नजरेतून साकारलेल्या आऊटफिटमध्ये कलाविश्वातील काही चेहरे कानच्या रेड कार्पेटवर येतात. बॉलिवूडच्या अभिनेत्रींनीही ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर चार चाँद लावले. सोनम कपूर, दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या आऊटफिटने फक्त छायाचित्रकार आणि चाहत्यांचीच मनं जिंकली नाहीत तर एका शेफलासुद्धा प्रेरणा दिली आहे.

‘ला १५ पेस्ट्री’ ही पेस्ट्री चेन चालवणारी शेफ पूजा ढिंग्रा हिने तिच्या कौशल्याला कानमधील या सेलिब्रिटींच्या डिझायनर आऊटफिटची जोड देत काही सुरेख केक बनवले आहेत. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर या केकचे फोटो पोस्ट करत अनेकांनाच थक्क केलं आहे. केक आणि मॅकरुन्सवर पूजाने केलेली ही कलाकुसर पाहता खाण्याच्या गोष्टींवरही ग्लॅमरस टच पाहायला मिळतो आहे, असंच म्हणावं लागेल.

वाचा: ‘त्या’ ब्लॉगमुळे सोनमवर पुन्हा टीकेची झोड

तिने पोस्ट केलेले हे फोटो पाहता, सध्या सोशल मीडियावरही तिचे फोटो बरेच चर्चेत आहेत. याविषयीच ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, ‘आम्ही कान फिल्म फेस्टिव्हलच्या एक आठवडा आधीपासूनच या संकल्पनेचा विचार करत होतो. त्या फेस्टिव्हलमधील काही लोकप्रिय लूक्सपासून प्रेरणा घेत आम्ही हे केक बनवले.’ पूजा आणि तिच्या टीमच्या कल्पकतेतून साकारलेल्या या केकचे फोटो सध्या अनेकांनीच सोशल मीडियावरुन शेअर आणि लाइक करत तिच्या कलेला दाद दिली आहे. त्यासोबतच अनेकांनी हे केक्स पाहून त्यावर कमेंट्सही दिल्या आहेत. काय आहेत त्या कमेंट्स हे जाणून घेण्यासाठी पाहा काही सुरेख फोटो…