बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा आगामी ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित होण्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमातून वेळ काढत आमिर सध्या वेगळ्याच कामात व्यस्त आहे. तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एका वेगळ्याच सेलिब्रेशनची तयारी करत असल्याचे कळते. तर आमिर आता त्याच्या लग्नाचा ११ वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीला लागला आहे.

किरण राव आणि आमिरच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण होणार असून तो किरणसाठी काही विशेष योजना करत असल्याचे कळते. काही संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसार, आमिर यावेळी त्याच्या पंचगणी येथील निवासस्थानी चार दिवसांचे सेलिब्रेशन करणार आहे. या सेलिब्रेशनसाठी त्याचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र मंडळी उपस्थित राहतील. विशेष म्हणजे ही पार्टी आमिरने किरणशी लग्न केलेल्याच घरात होणार आहे. २८ आणि २९ डिसेंबरला आमिर आणि किरण सुट्टीचा आनंद घेतील. तर २९ डिसेंबरला सर्व पाहुणे तेथे सेलिब्रेशनसाठी पोहोचतील. हे सेलिब्रेशन १ जानेवारीपर्यंत चालेल. यात नववर्षाच्या पार्टीचाही समावेश असणार आहे. दरम्यान, आमिरने एका शायरी नाइटचेही आयोजन केल्याचे कळते. यासाठी काही गायकांनाही आमंत्रण देण्यात येणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, आमिरचे संपूर्ण कुटुंब आणि त्याचे मित्र राजकुमार हिरानी, प्रसून जोशी, करण जोहर, अयान मुखर्जी यांच्यासह ‘दंगल’ चित्रपटाची टीमही यावेळी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान,  ‘दंगल’ या चित्रपटाबद्दल बरंच बोललं जातं आहे, लिहिलं जातं आहे. आमिर खान याने महावीर फोगट यांच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, गीता आणि बबिता कुमारी यांच्या भूमिकेसाठी चित्रपटातील चार अभिनेत्रींनी घेतलेली मेहनतही लोकांपर्यंत सध्या पोहोचते आहे. ‘दंगल’मध्ये आमिर खानचा प्रवेश नेमका कसा झाला? त्यामागचे कारण आता समोर आले आहे. एका मुलाखती दरम्यान दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी याचे उत्तर दिले. ते म्हणाले की, दिग्दर्शक म्हणून आमिर खानबरोबर काम करायला मिळावं ही इच्छा होती. मात्र ‘दंगल’ची कथा लिहिताना ती कोणत्याही कलाकाराला समोर ठेवून लिहायची नाही, हे डोक्यात पक्कं  होतं. तसं केलं तर तुमच्या कथेवर त्या कलाकाराचा प्रभाव पडतो. त्यामुळे आम्ही आधी प्रामाणिकपणे कथा लिहून काढली. त्यासाठी आम्ही महावीरजी आणि त्यांच्या पत्नीला जाऊन भेटलो. पटियालात जाऊन गीता-बबिता यांना भेटलो. तेव्हा या गोष्टीच्या दोन्ही गमतीशीर बाजू आमच्या हाताला लागल्या होत्या. त्यानंतर मग त्यांचे प्रशिक्षक, अन्य सहकारी यांच्याबरोबरच्या गप्पांमधून एक खरोखरच चांगली कथा आकाराला आली. त्यानंतर ‘यूटीव्ही’कडून जेव्हा महावीर फोगट कोण, असा प्रश्न विचारला तेव्हा आमिर खान हे एकच उत्तर मी दिलं आणि अर्थात कोणीच नकार देऊ शकणार नाही असं हे उत्तर होतं.