कंगनाने दिलेल्या एका मुलाखतीमुळे आता ती चांगलीच फसल्याचं पाहायला मिळतंय. चित्रपटसृष्टीतील काही मोजकी मंडळी वगळता तिला कोणीही पाठिंबा देताना दिसत नाहीये. निर्भीडपणे केलेली वक्तव्य आता ‘क्वीन’ कंगनाच्याच अंगाशी आल्याचं पाहायला मिळतंय. कारण, दर दिवसाआड तिच्या या मुलाखतीच्याच पार्श्वभूमीवर काही गोष्टी नव्याने सर्वांसमोर येत आहेत. या सर्व प्रकरणाच्या चर्चांचं वादळ शमत नाही तोच आता आणखी एक खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

एका प्रसिद्ध वेबसाइटने कंगनाच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता, कंगना रणौत आणि अपूर्व असरानी यांच्यात झालेल्या संवादाचा लेखी पुरावा सर्वांसमोर उघड केला आहे. ‘सिमरन’ चित्रपटातील संवाद लेखनाचं श्रेय कोणाला मिळावं हा वादच होता. पण, फक्त अपूर्वसोबतच तिचा वाद होता असं नाही तर दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासोबतही तिचं नातं फारसं चांगलं नव्हतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटलांटामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच कंगनासोबत झालेल्या वादामुळे मेहता यांनी सेटवर येणं बंद केलं होतं. त्यामुळे काही दृश्यांवेळी खुद्द कंगनानेच दिग्दर्शकाची भूमिकाही बजावली. त्यांच्यात झालेले मतभेद मिटवण्यासाठी मेहता यांच्या मुलाने म्हणजेच जयने पुढाकार घेतल्याचं सांगितलं जातंय.

‘पिंकव्हिला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ८ मार्चला कंगनाने पटकथा लेखक अपूर्व असरानीला एक मेसेज केला होता ज्यामध्ये तिने लिहिलेलं, ‘मूर्ख आणि नेभळट व्यक्तिमत्व असणाऱ्या दिग्दर्शकासोबत आता मला काम करायचं नाहीये. त्याच्या स्वार्थी टीमसोबतही आता माझा काहीच संबंध नसेल. एकीकडे तो स्वत:ला स्त्रीवादाचा प्रणेता म्हणवतो, मला प्रोत्साहन देतो तर दुसरीकडे मात्र जी महिला चित्रपटातील काही दृश्यांचं दिग्दर्शन करतेय तिच्यासोबत आपले सूर जुळत नसल्याचं कारण देत तो चित्रपट सोडून जातोय. आता कुठे गेला त्याच्यातील स्त्रीवादाला प्रोत्साहन देणारा दिग्दर्शक?’

वाचा : कंगनाच्या ‘सिमरन’मधील हिरोबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

‘माझ्या नावावर पैसे मिळतात. मी जखमी असतानाही मोठ्या जबाबदारीने चित्रपटातील काही दृश्यांचं दिग्दर्शन केलं. त्यावेळी मूळ दिग्दर्शकाने पळ काढला म्हणून आपणही काढता पाय घेतला पाहिजे असं मी म्हणाले नाही’, असंही कंगनाने लिहिलं होतं. ‘सिमरन’च्या दिग्दर्शकासोबत झालेल्या वादानंतर कंगनाचे अपूर्व असरानीसोबतही बरेच मतभेद झाले होते.

कंगना आणि हंसल मेहता यांच्यात असलेले मतभेद कधीही चित्रीकरणादरम्यान प्रसारमाध्यमांसमोर आले नाहीत. किंबहुना चित्रपटाच्या प्रसिद्धी वेळीसुद्धा त्यांच्यात असे काही मतभेद असल्याची पुसटशी कल्पनाही कोणाला आली नव्हती. त्यामुळे आता झालेल्या या उलगड्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.