‘जुडवा २’ सिनेमात मूळ ‘जुडवा’ सिनेमातील करिश्मा कपूरची व्यक्तिरेखा जॅकलिन फर्नांडिस साकारताना दिसणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का, सिनेमाचे चित्रीकरण करताना तिला दिग्दर्शक डेव्हिड धवन यांची फार भीती वाटायची. सगळ्यांनाच माहित आहे की, कधीही वादात न अडकणारे आणि सहज समोरच्याला आपलेसे करणारे डेव्हिड यांना कोण कसं घाबरू शकतं. पण तुम्हाला जेव्हा कळेल की जॅकलिन त्यांना नेमकं कोणत्या कारणासाठी घाबरत होती त्याने तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

नुकताच मुंबईमध्ये ‘जुडवा २’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये स्वतः जॅकलिननेच याविषयी सांगितले. जॅकलिन म्हणाली की, बॉलिवूडमध्ये त्यांच्यासारखे विनोदीपट कोणीही करत नाहीत. विनोदीपटांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. ते बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक आहेत.

यावेळी जॅकलिनने वरुण आणि डेव्हिड या बाप-लेकांमधील केमिस्ट्रीही सांगितली. दोघंही एकमेकांना पुरक आहेत. सेटवर प्रत्येक सीनसाठी या दोघांना भांडताना पाहून खूप मजा यायची. कधी एखादा शॉट वरुणला आवडायचा तर तो शॉट पुन्हा एकदा करण्यास डेव्हिड सर सांगायचे. यावरुन त्या दोघांमध्ये जी भांडणं व्हायची ती पाहायला मला फार धमाल यायची.

‘जुडवा २’ मध्ये जॅकलिनने करिश्मा कपूरची व्यक्तिरेखा साकारली आहे तर अभिनेत्री तापसी पन्नू रंभाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. सलमानचा ‘जुडवा’ सिनेमा यशस्वी होण्यामागे त्यातील गाण्यांचा मोठा वाटा होता. सिनेमातील ‘ऊंची है बिल्डिंग’ आणि ‘टन टना टन’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. हेच लक्षात घेऊन ‘जुडवा २’ सिनेमात या दोन्ही गाण्यांचे रिमेक करण्यात आले आहेत. ट्रेलर पाहता काही दृश्य पहिल्या भागातून जसेच्या तसे कॉपी केल्याचेही पाहायला मिळते. ही दृश्ये पाहून पुन्हा एकदा सलमान खानचा ‘जुडवा’ सिनेमा पाहण्याचीच इच्छा होते. येत्या २९ सप्टेंबरला ‘जुडवा २’ प्रदर्शित होणार आहे.