‘बाहुबली’ प्रदर्शित झल्यापासूनच ‘बाहुबली २’ कसा असणार याची उत्कंठा सिनेरसिकांना होती. त्यात कट्टपाने बहुबलीला का मारलं? या गूढ प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. याच काराणामुळे बाहुबली २ प्रदर्शित होण्याआधीच त्याचे शो हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळतेय. अनेकांना पहिल्या दिवशी चित्रपटाच तिकीट मिळालं नाही. तर अनेक ठिकाणी ब्लॅकने तिकीट विक्री झाली. त्यामुळे तिकीटाचा दर दुप्पट तिप्पट पहायला मिळाला. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरमध्ये ‘बाहुबली २’ साठी फक्त ५० रुपये तिकीट आहे.

सध्या तेर हित संतगोरोबकाका यात्रा सुरु आहे. या यात्रेत फिरती सिनेमागृह असतात. त्यामध्ये बॉलिवूड, मराठी, तामिळ असे चित्रपट दाखवले जातात. सध्या यात्रा सुरु असल्याने यात्रेतील कोहिनूर टुरिंग सिनेमागृहात ‘बाहुबली २’ दाखवला जात आहे. खुल्या जागेवर तंबू ठोकून हे सिनेमागृह बनवलं जात. एका शोला साधारणतः ५०० लोक चित्रपट पाहू शकतात. येथील तिकीट दर खेडेगावातून येणाऱ्या यात्रेकरूंना परवडणारा आहे. ३० आणि ५० रुपयात येथे चित्रपट दाखवला जातो. ३० रुपयात मराठी आणि ५० रुपयात हिंदी चित्रपट अशी त्याची विभागणी केली जाते.

‘बाहुबली २’ ला मल्टिप्लेक्सप्रमाणे टुरिंग सिनेमागृहातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अगदी वाजवी दरात ते ही निसर्गाच्या सानिध्यात चित्रपट पहायला मिळत असल्याने प्रेक्षक मोठी गर्दी करत आहेत. तेर येथील रहिवाशी असलेले मुन्ना राऊत यांचा यात्रेमध्ये चित्रपट दाखवण्याचा पीडिजात व्यवसाय आहे. रवी आणि मुन्ना ही भावंड आता तो सांभाळत आहेत.