दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमावरचं संकटांचं सावट काही केल्या दूर होत नाही असेच दिसते आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी सेटची तोडफोड करुन तो जाळण्याचाही प्रयत्न केला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच कोल्हापूरमध्ये मंगळवारी मध्यरात्री सांगलीच्या तीन तरुणांनी दारुच्या नशेत चित्रीकरण सुरु असतानाच सेटवर बराच धिंगाणा घातला.

सिनेमाचे चित्रीकरण ज्या ठिकाणी सुरु होते तेथे तीन युवकांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून गाडी चित्रीकरणस्थळी नेण्याचा प्रयत्नही केला होता. हा धिंगाणा सुरु असल्याचे लक्षात येताच म्हाळुंगे गावातील ग्रामस्थ आणि सेटवरील सुरक्षारक्षकांनी या तीनही तरुणांना पकडून चांगलाच चोप दिला. गौरव सातपुते, सिद्धार्थ शेडगे, विश्वेश खोलाडकर अशी या तरुणांची नावं असून, या तिघांनाही पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्येच ‘पद्मावती’ सिनेमाचा सेट जाळण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच काही वाहनांवर दगडफेकही करण्यात आली होती. कोल्हापूरमधील ही काही पहिलीच घटना नाही. याआधी राजस्थानमध्येही या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान करणी सेनेने संजय लीला भन्साळी यांना मारहाण करुन सेटचे मोठे नुकसान केले होते. करणी सेनेने राजस्थानमध्ये सिनेमाचे चित्रीकरण करण्यास मनाई केली होती. सिनेमात राणी पद्मावती यांची प्रतिमा आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करणी सेनेने केला होता.

‘पद्मावती’ सिनेमात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात दीपिका राणी पद्मावती तर, रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्लजीच्या भूमिकेत झळकणार आहे.