भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षपूर्तीसाठी तयार होणारा ‘बॉम्बे टॉकीज’ हा चित्रपट बॉलिवुडवर वर्चस्व गाजवणाऱ्या खान त्रिमूर्तीना एकत्र आणण्यासाठी एक निमित्त ठरला असता. पण, ‘दबंग’ सलमान खानच्या नकारघंटेमुळे हा क्षण त्यांच्या चाहत्यांसाठी हुकला आहे. एक  काळ असा होता की सलमान, आमीर आणि शाहरूख हे तिघेही चांगले मित्र होते. कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीत शाहरूख आणि सलनानचे भांडण झाले आणि या तिघांचे सूर कायमचेच बिघडले.
निदान, ‘बॉम्बे टॉकीज’साठी आपसातील भांडण विसरून हे तिघे एकत्र येतील, अशी निर्माते-दिग्दर्शकांची अपेक्षा होती. मात्र, शाहरूखबरोबर एका फ्रेममध्ये यायचेच नाही, असा हेका धरून बसलेल्या सलमानने तारखा नसल्याचे कारण पुढे करीत चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.
‘बॉम्बे टॉकीज’ हा चित्रपटसृष्टीवर आधारित वेगवेगळ्या चार कथांवर बेतलेला एक चित्रपट आहे. या चित्रपटासाठी बॉलिवुडचे आघाडीचे चार दिग्दर्शक करण जोहर, झोया अख्तर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी एकत्र आले आहेत. हा चित्रपट पूर्ण झाला असून या चारही कथांना एकत्र बांधणारे एक गाणे चित्रपटात असावे आणि त्यासाठी बॉलिवुड गाजविणाऱ्या तीन खानांना एकत्र आणायचे असा निर्मात्याचा उद्देश होता. आमीरने आपल्या शेडय़ूलमधून वेळ मिळताच आपल्या भागाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे.
शाहरूखने चित्रिकरण केले नसले तरी ‘बॉम्बे टॉकीज’चा निर्माता करण जोहर असल्याने तो या गाण्यात सहभागी होणार हे निश्चित आहे. सलमानने मात्र आपल्याकडे चित्रिकरणासाठी तारखा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले आहे. सुरुवातीला आमीरनंतर सलमानला विचारणा करण्यात आली होती, तेव्हा त्याने नकार दिला नव्हता. पण, शाहरूखने चित्रिकरणासाठी होकार दिला हे कळताच सलमान नकार देऊन मोकळा झाला.
खरेतर, या तिघांनी एकत्र येऊन एकाच वेळी चित्रिकरण के ले असते तर आणखी मजा आली असती. पण, आमीरच्या व्यस्त शेडय़ूलमुळे त्याने आधी चित्रिकरण उरकून घेतले. आता शाहरूखचा भागही चित्रित होईल. योगायोगाने आमीर आणि शाहरूख पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. सलमानने या दोघांबरोबरही चित्रपट केले असल्याने हा वेगळाच प्रयत्न ठरला असता. सलमानच्या नकारामुळे निर्माते-दिग्दर्शक आणि त्याच्या चाहत्यांचीही घोर निराशा झाली आहे.