नेहरू सेंटरच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘थिएटर फेस्टिव्हल’मध्ये यंदा देशभरातील विविध भाषांमधील दहा नाटकांमध्ये ‘ती’ या मराठी नाटकाची निवड करण्यात आली होती. ‘ती’ या नाटकाचा प्रयोग आता गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे.

मराठी रंगभूमीवर खूप कमी वेळा गूढकथा व भयकथेवर आधारित नाटय़प्रयोग केले गेले आहेत. रोहन टिल्लू लिखित आणि प्रीतेश सोढा दिग्दर्शित ‘ती’ हे एक रहस्यमय नाटक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इस्लामपूरजवळील चंदनगड या गावात या नाटकाचे कथानक घडते. संजीव देशपांडे हा मध्यमवयीन गृहस्थ अ‍ॅडव्होकेट पटवर्धन नावाच्या दिग्दर्शकाकडे जातो. संजीव देशपांडेला त्याच्या मनात दडलेली गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. कामानिमित्त देशपांडे चंदनगडमध्ये जातो. तिथे निरनिराळे लोक त्याला भेटतात, तिथे एक गूढ घटना घडल्याचे त्याला समजते. या गूढ घटनेभोवती या नाटकाची गुंफण करण्यात आली आहे. युटोपिया कम्युनिकेशनने या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचा प्रयोग यापूर्वी एनसीपीएतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब’ या नाटय़ महोत्सवातही सादर झाला असून या दोन्ही महोत्सवांमध्ये त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.