26 March 2017

News Flash

नाटय़रंग : ताजेपणा टिकून ठेवण्याचं टॉनिक

मुळात ‘ती फुलराणी’ हे काही नव्याने रंगभूमीवर आलेलं नाटक नाही.

सौरभ नाईक | Updated: March 21, 2017 8:54 AM

‘अष्टगंध एन्टरटेन्मेन्ट’ निर्मित ‘ती फुलराणी’ हे नाटक प्रेक्षकांच्या अपेक्षांचा डोलारा चांगल प्रकारे सांभाळते असं म्हणायला हरकत नाही.

‘ती फुलराणी’ हे पुलंचं रसिकप्रिय नाटक. भक्ती बर्वे, अमृता सुभाष यांनी आपल्या अभिनयातून ते अधिकच लोकप्रिय केलं आहे. आताच्या नव्या चमूने त्याला आणखी उंचीवर नेलं आहे.

मुळात ‘ती फुलराणी’ हे काही नव्याने रंगभूमीवर आलेलं नाटक नाही. त्यामुळे या नाटकाचा प्रयोग रसिकांनी या आधीही पाहिलेला असल्याने तुलना होण्याची दाट शक्यता होती. त्याचप्रमाणे प्रेक्षक काही आडाखे बांधून प्रयोगास जातात. रसिकांच्या मन:पटलावर भक्ती बर्वे, अमृता सुभाष यांसारख्या कलाकारांचा अभिनय रेंगाळत राहिल्याने आता त्या सगळ्याला एकतर जोड देत किंवा पूर्ण नवं, असं काहीतरी करून दाखवण्याची ईर्षां नाटकाच्या नव्या चमूला असणं साहजिक होतं. पण त्या कसोटीस उतरत कुठेही सादरीकरण कमी पडू न देता ‘ती फुलराणी’चा दर्जा टिकवण्यात नव्या चमूला यश आलंय. ‘अष्टगंध एन्टरटेन्मेन्ट’ निर्मित ‘ती फुलराणी’ हे नाटक प्रेक्षकांच्या अपेक्षांचा डोलारा चांगल प्रकारे सांभाळते असं म्हणायला हरकत नाही.

नाटकाचं कथानक प्रेक्षकांना आधीच माहीत असल्याने सादरीकरणात नावीन्य आणण्याची मोठी जबाबदारी कलाकारांवर होती. कारण प्रेक्षकांना अगदी नाटक तोंडपाठ होतं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कथा, संवाद हे सगळंच माहीत असल्याने गुंतवून ठेवण्यासाठी अभिनयात ताकद असणं महत्त्वाचं होतं. जे सगळ्या कलाकारांनी उत्तम प्रकारे काम पार पाडलंय.

नाटकाची उद्घोषणा विशेष आहे. ती वातावरणनिर्मिती करण्यात यशस्वी ठरते. प्रयोग सुरू होताच नेपथ्य विशेष लक्ष वेधून घेतं. तो रस्ता, ते चित्रपटगृह अगदी जिवंत वाटू लागतं. आणि पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रियांमुळे ते अजून उठावदार होतं. म्हणजे पावसाळी दिवसात टॅक्सी पाणी उडवून जाण्याची क्रिया तशी नेहमीचीच. पण त्यावर जो सगळ्या पात्रांनी अभिनय केला आहे त्यावरून एक क्षण खरंच पाणी उडालं की काय असं वाटू लागतं. अजून काही प्रसंगात दोन वेगवेगळे बंगले दाखवण्याचं आणि ते तितक्या सशक्तपणे उभं करण्याचं आव्हान नेपथ्यकारासमोर होतं, आणि ते आव्हान संदेश बेंद्रे यांनी लीलया पेललंय. या सगळ्या घटकांसाठी रंगमंच व्यवस्था करणारेही तितकेच कौतुकास पात्र आहेत. विशेषत: नाटकाच्या नेपथ्यामध्ये पुढल्या दोन्ही बाजूच्या िवगेस अखंड िभतींवर पुलंचं रेखाटलेलं पुसटसं चित्र फार भावतं. पुलं आडून प्रयोग पाहत असल्याचा भास होतो. नाटकाचं संगीतही साजेसं झालंय. बऱ्याचदा प्रसंगात संगीताची पेरणी न झाल्याने प्रसंग संगीतिकदृष्टया ओकाबोका वाटतो. पण काही ठिकाणी संगीतयोग व्यवस्थित जुळून आलाय. त्याप्रसंगी नाटकाचे संगीतकार निषाद गोलांबरे यांना सुधारणा करण्यास बराच वाव आहे आणि संगीताची नितांत गरज असलेल्या प्रसंगात जागाही आहेत.

oakनाटकाची प्रकाशयोजना प्रसंगानुरूप बहरते. काही प्रसंगात उत्कृष्ट प्रकाश मांडणी झाली असून काही प्रसंग उगीचच ‘जनरल लाइट’वर केल्याने प्रसंगास उठावदारपणा येत नाही. भूषण देसाई यांनी केलेली प्रकाश मांडणी नाटकाला एका चौकटीपलीकडे घेऊन जात नाही. परिणामी अपेक्षित मेळ साधला जात नाही. नाटकाचा कपडेपटही विशेष मेहनत घेत असेल असे मंजुळेची भूमिका साकारणाऱ्या हेमांगी कवी हिच्या वेशभूषेकडे पाहून वाटतं. वेशभूषाकार महेश शेरला यांनी सगळ्यांचीच वेशभूषा चपखल केली आहे. वेशभूषेकडे पाहताच नाटकाच्या काळाची प्रचीती येते. अभिनयाच्या बाबतीत नाटक जास्त उजवं ठरतं. मंजुळेचं पात्र साकारणाऱ्या हेमांगी कवी यांनी उत्तम अभिनय केला असून त्यावर मेहनत घेतल्याचे दिसून येते. वर्षांनुवष्रे गाजलेली भूमिका एका नव्या अभिनेत्रीच्या रूपात समोर आणणं आणि ती सर्वमान्य होऊन प्रेक्षकांना आवडणं ही सामान्य गोष्ट नव्हे. हेमांगी कवी यांनी मंजुळा हुबेहूब साकारली. त्यात ‘त्या’ स्वत: कुठेच डोकावल्या नाहीत, इतकं ते पात्र जिवंतपणे उभं करण्यात आलं. त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव, रंगमंचाचा वापर आणि भाषा शैलीत केलेला नकळत बदल वाखाणण्याजोगा आहे. प्रो. अशोक जहागीरदार हे पात्र रंगवणाऱ्या डॉ. गिरीश ओक यांचाही अभिनय सुंदर झाला असून एक भाषा पंडित त्यांनी छान साकारलाय. त्यांचा आवाज, देहबोली आणि चर्या यावर त्यांची कमालीची हुकूमत जाणवली. विसू भाऊ यांचं पात्र साकारणाऱ्या विजय पटवर्धन यांनीही छान काम केलंय. त्यांची विनोदाची पेरणी आणि विनोदाचं टायिमग उत्तम जमलंय. एकूणच लेखनात ठासून दम भरला असल्याने लिखाणाच्या बाबतीत किंवा नाटकाच्या संहितेच्या बाबतीत प्रश्नच उद्भवत नाही. राजेश देशपांडे यांचं दिग्दर्शनही चांगलं झालंय. नाटकाला पुरेपूर न्याय देण्याचं काम त्यांनी केलंय.

एकूणच जुने दिवस पुन्हा नव्याने जगावेसे वाटले आणि ‘पूर्वीसारखं आता काही राहिलं नाही’, ‘ते नाटकांचे सुवर्णदिन आता कुठे?’ असं काही मनात येऊ लागलं की सरळ उठून येऊन हे नाटक पाहायला हरकत नाही. तुमच्यातील ताजेपण आणि चिरंतनपणा टिकवून ठेवण्याचं टॉनिक म्हणजे ‘ती फुलराणी’ हे नाटक.

‘ती फुलराणी’
रूपांतर – पु. ल. देशपांडे
दिग्दर्शन – राजेश देशपांडे
संगीत – निषाद गोलांबरे
प्रकाश योजना – भूषण देसाई
नेपथ्य – संदेश बेंद्रे
कलाकार – मंजुळा – हेमांगी कवी; प्रो. अशोक जहागीरदार – डॉ. गिरीश ओक; विसूभाऊ- विजय पटवर्धन.

[email protected]

First Published on March 21, 2017 8:54 am

Web Title: ti phulrani classic marathi natak hemangi kavi girish oak