‘ती फुलराणी’ हे नाटक पु.ल.देशपांडे यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. यातील संवादाला तोड नाहीच. शिवाय ते तसेच्या तसे रसिकांपर्यंत पोहचविण्याचे मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन ‘ती फुलराणी’ या नाटकातील रंगकर्मी हेमांगी कवी यांनी केले. यावेळी उपस्थित डॉ. गिरीष ओक यांनी दडपणाशिवाय उत्तम नाटक सादर होत नाही, असे वक्तव्य केले.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद युवा विभाग डोंबिवली या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या अभिव्यक्ती उपक्रमाच्या माध्यमातून शनिवारी सायंकाळी बालभवन डोंबिवली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना मराठी कवितेचे भावविश्व उलगडून दाखवावे या हेतूने जुन्या, नव्या कवितांचे सादरीकरण सृष्टीगान या कार्यक्रमाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या निसर्गाच्या विविधांगी पैलू उलगडून दाखविणाऱ्या कवितांचा यामध्ये समावेश होता. कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गायन, वाचन आणि नृत्य सादर केले. या कार्यक्रमाची सुरुवात कवी गोविंद यांच्या ‘नमने वाहुनि स्तवने उधळा’ या भूपाळीने झाली. बालकवी यांची ‘ऊठ मुला बघ अरुणोदय झाला’ ही कविता सादर करण्यात आली. कुसुमाग्रजांची ‘गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूचे पडती सडे’, शांता शेळके यांच्या ‘वेश रेशमी लेवू, या गरगर गिरकी घेऊया, गदिमांच्या ‘इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावर’ या कवितेला चांगलीच दाद मिळाली. सुमनबाई कासार यांची ‘हसत जाऊ फुले सुगंधी घेऊ’ ही कविताही उत्तम रंगली.
बालकवींच्या तारकांचे गाणेमधील ‘कुणी नाही गं कुणी नाही, आम्हाला पाहत बाई’ या गीतावर नृत्य करताना मुलांनी चांदण्या परिधान केल्या होत्या. शांता शेळके यांच्या ‘पक्ष्यांच्या दुनियेत’ या कवितेला श्ॉडो इफेक्ट देण्यात आला होता. कार्यक्रमाचा शेवट ढेरे यांच्याच ‘सुंदर जग सुंदर सृष्टी’ या कवितेच्या सादरीकरणाने झाला.
या कार्यक्रमाची संकल्पना वैशाली वैशंपायन यांची होती. तर मकरंद वैशंपायन यांनी संगीत संयोजन केले होते. आनंद हरिदास आणि पल्लवी आनंद यांनी नृत्य दिग्दर्शन केले.