अभिनेते आणि भाजपचे लोकसभेतील खासदार परेश रावल यांनी ट्विटरवरून लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्यावर निशाणा साधला होता. काश्मिरात दगड फेकणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी युवकाचा मानवी ढाल म्हणून उपयोग करण्याऐवजी अरुंधती रॉय यांनाच जीपला बांधायला हवे होते, असे वादग्रस्त ट्विट त्यांनी रविवारी केलेले. त्यांच्या या ट्विटचे गायक अभिजित भट्टाचार्य याने समर्थन केले आहे. विशेष म्हणजे परेश यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत अरुंधती यांना गोळ्या घालायला हव्यात, असे त्याने म्हटलेय.

अभिजितच्या ट्विटनंतर नेटिझन्सनी त्याच्यावर टिकेचा वर्षाव केला. नेटिझन्सच्या टिकेलाही त्याने तिखट शब्दांमध्ये उत्तर दिले. ‘अभिजित भट्टाचार्य आणि परेश रावल यांच्यासारख्या व्यक्तींना ट्विटरवर ब्लॉक करायला हवे. हिंसा थांबवण्यासाठी अशा लोकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करायला हवी,’ असे एका नेटिझनने ट्विट केले. यावर अभिजीतने खूप वाईट शब्दांमध्ये उत्तर दिले. त्यावर, ‘अभिजित बाबू तुमच्या भाषेवर लक्ष द्या. इतक्याही खालच्या पातळीला जाऊ नका,’ असे युजरने म्हटले.

नेटिझन्स आणि अभिजितमध्ये जणू ट्विटर वॉरच झाल्याचे पाहायला मिळाले. ‘तुझ्यासारख्या देशभक्तांना प्राणी संग्रहालयात ठेवायला हवे. तुमच्यासारखी माणसं समाजासाठी घातक असतात,’ असे ट्विट एका मुलीने करताच अभिजितनेही त्याच्या शब्दांत तिचा समाचार घेतला.

abhijeet-1

abhijeet-2

काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांवर दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी जवानांनी स्थानिक तरुणाऐवजी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय Arundhati Roy यांनाच त्या जीपला बांधायला हवे होते, असे परेश रावल यांनी ट्विटमध्ये लिहिले होते. त्यांच्या या ट्विटनंतर लोकांना भडकावण्याचा आरोप त्यांच्यावर नेटिझन्सनी केला. ‘एक थिएटर, चित्रपट अभिनेता आणि लोकसभा खासदार हिंसेला प्रोत्साहन देत आहे,’ असे राकेश शर्मा या युजरने म्हटले होते.

अरुंधती रॉय यांच्याविरोधात केलेल्या ट्विटमुळे परेश रावल आणि अभिजित भट्टाचार्य हे दोघेही नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जात आहेत.