फॅशन इंडस्ट्रीतील सर्वात मोठा सोहळा म्हणून नावाजला गेलेला ‘लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्ह २०१७’ मुंबईत पार पडला. यंदाही नेहमीप्रमाणे फॅशन डिझायनर्सपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत या सोहळ्यात फॅशन आणि ग्लॅमरची नांदी पाहायला मिळाली. मात्र या फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी असे काही झाले ज्याचा कोणी अंदाजही लावला नसेल. या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ मात्र खरा हिरो ठरला.

मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या कपड्यांमध्ये रॅम्प वॉक करण्यासाठी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी या फॅशन वीकमध्ये पोहोचले. ब्लॅक ब्लेझर आणि डेनिममध्ये टायगरने आधी रॅम्प वॉक केला. फोटोग्राफर्ससाठी पोझ दिली आणि मागे वळला. त्यानंतर दिशा रॅम्पवर पुढे येण्याआधीच टायगरने तिला थांबवलं आणि तिला हळूच एका गोष्टीबद्दल सजग केलं. टायगरच्या या एका इशाऱ्यावर दिशा रॅम्प वॉकवरुन बाजूला होऊन मागे परतली.

वाचा : परेश रावल राजकारणातून घेणार एक्झिट?

रॅम्पवर दिशाने माघार घेण्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. तिने मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला शिमरचा शॉर्ट ड्रेस घातला होता आणि रॅम्प काचेचा होता. अशा वेळी जर तिने रॅम्प वॉक केला असता तर वॉर्डरोब मालफंक्शनची ती शिकार झाली असती. रॅम्पवर चालतानाच टायगरच्या हे लक्षात आले आणि त्याने तिला रोखले. थोड्या वेळानंतर रॅम्पवर कार्पेट टाकलं गेलं आणि त्यानंतर कार्पेटवर तिने वॉक केला. आपली समयसूचकता दाखवून टायगरने सर्वांची मनं जिंकली.