बॉलीवूडमध्ये आपल्या नृत्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता टायगर श्रॉफ याचे गुरु शौर्य भारद्वाज यांच्यावर खोटं बोलल्याचा आरोप लावण्यात आला आहे. टायगरच्या या गुरुंना तुम्ही बागी चित्रपटात पाहिले आहे. शौर्य हे टायगरला ऑफ स्क्रिनही प्रशिक्षण देतात. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या वृत्तानुसार, अभिषेक शुक्ला नावाच्या नेटिझनच्या मते शौर्य भारद्वाज हे कमांडो ट्रेनर नाहियेत. शौर्य स्वतःला भारतीय सेनेचे सल्लागार असल्याचे सांगतात. सर्वोत्कृष्ट कमांडो ट्रेनरचा किताब जिंकल्याचेही शौर्य यांचे म्हणणे आहे.

मूळचे मध्यप्रदेशचे असलेल्या शौर्य यांनी फोर्स-१, स्पेशल फोर्स-२, द रॉयल मरीन डेख ऑफ इमोर्टल्स, द लिजेंड ऑफ इराक वॉर, स्नायपर विंग्स सीरीज यांसारख्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये अॅक्शन सिक्वेन्ससाठी कलाकारांना प्रशिक्षण दिलेले आहे. अभिषेक शुक्लाचे म्हणणेय की, शौर्य यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते चित्रपटांमध्ये अॅक्शन ट्रेनिंग देतात पण ते कमांडो ट्रेनर नाहीयेत. तसेच, ते जगातील सर्वोत्कृष्ट कमांडो ट्रेनरही नाहीयेत. मात्र, शौर्य यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, अभिषेकवर मानहानीचा दावा करणार असल्याचेही म्हटले आहे. शौर्य भारद्वाज हे बागी चित्रपटात टायगर श्रॉफच्या गुरुच्या भूमिकेत दिसले होते. चित्रपटात ते कमालीच्या टेक्निक्स आणि स्टंट्स शिकवताना दिसले होते. तसेच, टायगरनेही यात खूप चांगले स्टंट्स केले होते.

लवकरच टायगर निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी स्टुडन्टस् ऑफ द इयर २ चित्रपटात झळकणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. दिशाच्या आधी या चित्रपटासाठी सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिची वर्णी लागली होती. ती या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात होते. पण, बहुधा सैफच्या नकारामुळे सारा ऐवजी दिशाला चित्रपटात घेण्यात आले आहे.