‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेचं शीर्षकगीत फक्त ऐकावंसं वाटत नाही तर बघावंसंही वाटतं. रूपेश नेवगी यांनी त्या शीर्षकगीतात केलेली सॅण्ड आर्ट हे त्यामागचं कारण.

Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

‘मी पहावे, तू दिसावे..पारणे या मनाचे फिटेना..’ हे गाणं रोज रात्री साडेआठ वाजता घरोघरी ऐकू येतं. श्रेया घोषालचा मधुर आवाज, श्रवणीय संगीत, अर्थपूर्ण शब्द यांमुळे या गाण्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. हे गाणं म्हणजे झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेचं शीर्षकगीत. या शीर्षकगीताने आणखी एका कारणामुळे लोकप्रियता मिळवली आहे आणि ते म्हणजे त्यात केलेलं सॅण्ड आर्ट अर्थात वाळूने केलेली कला. एखाद्या मालिकेच्या शीर्षकगीतामध्ये सॅण्ड आर्ट करणं ही कल्पनाच अनोखी आहे. ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे रूपेश नेवगी यांनी. मूळचे सिंधुदुर्ग-कुडाळ येथील रूपेश यांनी त्यांच्या कलाविष्कारातून हे शीर्षकगीत सादर केलंय.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेच्या शीर्षकागीतासाठी रूपेश यांच्या सिंधुदुर्ग ते मुंबई प्रवासाला कशी सुरुवात झाली याचा प्रसंग त्यांनी सांगितला. ‘मालिकेचे निर्माते संतोष कणेकर यांना मी एकदा भेटलो. मला अभिनयाची आवड आहे. त्यामुळे त्यासंदर्भात मी त्यांना भेटलो. त्यांनी मी यापूर्वी केलेल्या कामाची विचारपूस केली. त्यांनतर त्यांनी मला ‘माझ्या मालिकेसाठी कला दिग्दर्शन करशील का’ असं विचारलं. मी लगेचच हो म्हणालो. मुंबई गाठलं. तिथे माझी भेट झी मराठीचे प्रोमो हेड अमोल श्रोत्री यांच्याशी झाली. कामासंदर्भात बोलत असतानाच त्यांना शीर्षकगीतावर सॅण्ड आर्ट करण्याची कल्पना सुचली. मालिकेच्या कथेनुसार मी सॅण्ड आर्टचे काही नमुने त्यांना करून दाखवले. आणि शेवटी शीर्षकगीतासाठी सॅण्ड आर्ट करण्याचं निश्चित झालं’, असं रूपेश यांनी सांगितलं.

मालिकेची शीर्षकगीतं हा नेहमीच चच्रेचा विषय असतो. एकवेळ मालिका लक्षात राहणार नाहीत पण, त्यांची शीर्षकगीतं आठवणीत राहतात. म्हणूनच शीर्षकगीतं अधिक आकर्षक कशी होतील यासाठी चॅनल प्रयत्नशील असतं. असाच यशस्वी प्रयत्न झी मराठी आणि मालिकेच्या निर्मात्यांनी केला. शीर्षकगीतातून मालिकेच्या कथेचं मूळ आणि शीर्षकगीताचे शब्द यांना अनुसरून सॅण्ड आर्ट साकारली आहे. दोन वेगवेगळ्या टोकांना बसलेल्या दोन व्यक्ती, त्यांच्यातलं अव्यक्त प्रेम, दोघांच्या निरनिराळ्या वाटा, दुरावा या सगळ्या भावना त्या सॅण्ड आर्टमध्ये अचूक टिपल्या आहेत. फुलपाखरू, पाऊलवाट, गुलाब, डोळे यांच्या माध्यमातून मालिकेची कथा थोडक्यात सांगितली आहे. याबद्दल रूपेश यांनी एक गोष्ट आवर्जून नमूद केली, ‘मालिकेचा विषय सॅण्ड आर्टमधून कळायला हवा असं असलं तरी त्याची गोष्ट पूर्णपणे प्रेक्षकांना समजायला नको, असं मी ठरवलं होतं. त्यामुळे ती पुसट रेषा मला सांभाळावी लागली. सॅण्ड आर्टमधून मालिकेची संपूर्ण कथा प्रेक्षकांना समजली तर काहीच अर्थ नाही. माझं हे मत मालिकेचे निर्माते आणि चॅनल दोघांनाही पटलं. म्हणूनच सॅण्ड आर्टमध्ये प्रेम, दुरावा हे दाखवायचं असं ठरवून सॅण्ड आर्ट पूर्ण केलं.’

सॅण्ड आर्ट खरंतर एका टेकमध्ये होते. म्हणजे त्यात सलगता असली की त्याच्या वेगामुळे त्याचा प्रभाव आणखी वेगळा पडतो. पण, विशिष्ट माध्यमासाठी सॅण्ड आर्ट करताना काही वेळा त्याच्या चौकटीतून बाहेर यावं लागतं. ‘खुलता..’च्या शीर्षकगीताच्या वेळी दाखवली जाणारी संपूर्ण सॅण्ड आर्ट करण्यासाठी रूपेश यांना जवळपास चार तास लागले. शीर्षकगीतासाठी सॅण्ड आर्ट करणं हेच मुळात वेगळं पाऊल होतं. त्यात तांत्रिक बाबींचाही मुद्दा येतोच. क्रिएटिव्हिटी आणि तांत्रिक गोष्टी या दोन्हींची सांगड घालत शीर्षकगीतात अतिशय सुंदर सॅण्ड आर्ट तयार झाली आहे.

सिंधुदुर्गमध्ये त्यांचा एक ग्रुप आहे. तो ग्रुप मनोरंजनाचे विविध कार्यक्रम करत असतो. या कार्यक्रमांमध्ये सॅण्ड आर्ट, चित्रकला, डोळे बंद करून चित्र काढणे, दोन्ही हातांनी चित्र काढणे, शिल्पकृती करणे असे वेगवेगळे प्रयोग केले जातात. आजवर त्यांच्या ग्रुपचे मुंबई, पुणे, गोवा, कोकण अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत. रूपेश एकांकिका, नाटकांमध्येही अभिनेता, नेपथ्यकार म्हणून काम करत असतात. याआधी त्यांनी अनेक मालवणी नाटकांमधून काम केलंय. ‘खुलता..’ या मालिकेच्या सुरुवातीचा एक महिना त्यांनी कलादिग्दर्शन केलं. पण, त्यानंतर सिंधुदुर्गमधील त्यांच्या नोकरीमुळे वेळेचं गणित जमून येत नव्हतं. त्यामुळे कलादिग्दर्शनाचं काम त्यांना तिथेच थांबावावं लागलं. कलादिग्दर्शन नसलं तरी सॅण्ड आर्टच्या माध्यमातून रूपेश नेवगी हे नाव प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचलं आहे. सिंधुदुर्गच्या रामेश्वर हायस्कूल, मिठबत, देवगड या शाळेत ते कलाशिक्षक आहेत. चित्रकला, हस्तकला, नृत्य, अभिनय, गायन, वादन, शिल्प या सगळ्या कला रूपेश पाचवी ते दहावीच्या मुलांना शिकवत आहेत. रांगोळी आणि वाळूचे शिल्प तयार करण्याचीही कला त्यांना अवगत आहे. या मालिकेच्या शीर्षकगीतामुळे त्यांना आणखी दोन मालिकांसाठी विचारलं गेलंय. एक िहदी आणि एक मराठी शोसाठी त्यांचं सध्या काम सुरू आहे.

सहज, सोपे, साधे पण आकर्षक, देखणे सादरीकरण अशी विशेषणं या मालिकेच्या शीर्षकगीताला देता येतील. सॅण्ड आर्ट करतोय म्हणजे काहीतरी हट के करूया असा विचार न करता, भपकेपणा न आणता त्या सादरीकरणात अतिशय साधेपणा आला आहे. मालिकेच्या शीर्षकगीताला एका वेगळ्याच रूपात दाखवल्यामुळे त्याला चार चाँद लागलेत हे नक्कीच!