अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लवकरच टिव्हीवरील ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी डान्स शोमध्ये परीक्षक म्हणून दिसणार आहे. स्पर्धकांच्या नृत्यकौशल्याचे परीक्षण करणे ही आपल्यासाठी कठीण जबाबदारी असल्याचे मत तिने व्यक्त केले. ‘झलक’च्या नवव्या पर्वात करण जोहर आणि कोरिओग्राफर गणेश हेगडेसोबत परीक्षकाची जबाबदारी पार पडणे हा आपल्यासाठी नवा आणि वेगळा अनुभव असल्याचे मत ‘हाऊसफुल ३’ च्या अभिनेत्रीने व्यक्त केले. हे एक वेगळे विश्व असून, टिव्ही मालिकेतील प्रसिद्ध कलाकारांच्या नृत्यकौशल्याचे परीक्षण करणे ही फार मोठी जबाबदारी असल्याचे मत प्रसिद्धी कार्यक्रमादरम्यान जॅकलिनने व्यक्त केले.
चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असतो आणि तिथे धमाल मस्ती करतो. परंतु, अशा कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहणे हा पूर्णत: वेगळा अनुभव असून मला यातून खूप काही शिकायला मिळत असल्याचे कलर्स वाहिनीवरील डान्स रिअॅलिटी शोचा हिस्सा झाल्याचा अनुभव कथन करताना या श्रीलंकन सौदर्यवतीने सांगितले. ३० जुलै रोजी ‘झलक’च्या नवव्या सत्राला कलर्स वाहिनीवर सुरुवात होत आहे. यावेळीदेखील मनिष पॉलच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. ‘ढिशूम’ चित्रपटातील भूमिकेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, या आधी मी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा खूप भिन्न आहे. इशिका ही विद्रोही आणि निर्भिड मुलगी असून, मुलांना तिची गरज आहे याची तिला चांगली जाण आहे. चित्रपटात जॉन आणि वरुणच्याबरोबरीने आपल्यालादेखील हाणामारीची दृश्ये साकारण्याची संधी मिळाल्याचे ती म्हणाली. दिग्दर्शक रोहित धवनच्या या चित्रपटात जॉन अब्राहम, वरुण धवन, साकिब सलीन आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिका आहेत. तर चित्रपटाला अभिजीत वाघनी यांनी संगीत दिले आहे. २९ जुलैला चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे.