सैन्यदल अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार नेहमीच पुढे असतो. त्याचं हेच देशप्रेम आणि सैन्यदलाप्रती असलेला आदर पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अक्षयने सैनिकांच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी काही पर्याय सुचवले आहेत. कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तो बोलत होता. देशातील प्रत्येक नागरिकाकडून सैन्यदलाच्या सुविधा पुरवण्यासाठी कर आकारला गेला पाहिजे असं मत त्याने यावेळी मांडलं.

‘देशात ज्याप्रमाणे स्वच्छतेसाठी ‘सेस’ आकारला जातो, त्याचप्रमाणे सैन्यदल जवानांना काही सुविधा पुरवण्यासाठी ‘आर्मी वेल्फेयर सेस’ म्हणजेच सैनिक कल्याण अधिभार आकारला जावा’, असं तो म्हणाला. खिलाडी कुमारने या कार्यक्रमातून सरकारला विनंती करत सैन्यदल जवानांसाठी ०.५% ते १% इतका कर आकारावा असे म्हटले. ज्याप्रमाणे स्वच्छतेसाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाकडून ०.५% कर आकारण्यात येतो त्याचप्रमाणे हा कर आकारला जावा, असं त्याने स्पष्ट केलं. बॉलिवूडचा हा अभिनेता नेहमीच त्याच्या समाजकार्यासाठीसुद्धा ओळखला जातो. त्याच्या विविध संकल्पना आणि सढळ हातांनी मदत करण्याची वृत्ती यांमुळे तो अनेकांचा आदर्शही आहे.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

https://www.instagram.com/p/BXAn_nrhGs1/

मुख्य म्हणजे सैन्यदलासाठी अशा नव्या योजा सुचवण्याची ही काही त्याची पहिलीच वेळ नाहीये. याआधीसुद्धा त्याने सीमारेषेवर वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली. त्यासोबतच या जवानांच्या कुटुंबियांना इतरांनीही आर्थिक मदत करावी यासाठी सुरु करण्यात आलेल्या एका ‘भारत के वीर’ या अॅपमध्येही त्याचा मोलाचा सहभाग आहे. देशहितासाठी लागू करण्यात आलेल्या योजनांमध्ये या अभिनेत्याचा सहभाग पाहता त्याने सुचवलेला ‘आर्मी वेल्फेयर सेस’ म्हणजेच सैनिक कल्याण अधिभाराचा पर्याय शासन दरबारी पोहोचणार का आणि तो पोहोचलाच तर तो लागू केला जाणार का, हे पाहावं लागेल.