अक्षय कुमारचा ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ हा या वर्षीचा पहिल्या आठवड्यात सर्वात जास्त कमाई करणारा सहावा सिनेमा ठरला आहे. देशभरात सुमारे ३००० स्क्रिनवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी १३.१० कोटींची कमाई केली. तर शनिवारी सुमारे १६ कोटींची कमाई या सिनेमाने केली. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक हिंदी सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटत असताना अक्षय कुमारचा हा सिनेमा मात्र जोरदार कमाई करताना दिसत आहे. या आठवड्यातही हा सिनेमा चांगली कमाई करेल असे म्हटले जात आहे. शुक्रवार आणि शनिवारचे बॉक्स ऑफिसचे आकडे पाहता हा सिनेमा रविवारी ५० कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई विमानतळावर दिसली नवाब कुटुंबियांची झलक

खिलाडीचे चाहते नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवून सिनेमागृहात त्याचा सिनेमा पाहायला जातात आणि आतापर्यंत अक्षयने त्यांना कधीच निराश केलं नाही असंच म्हणावं लागेल. ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’ने शुक्रवारी सकाळच्या शोला आलेल्या खिलाडी कुमारच्या चाहत्यांशी संवाद साधला, त्या सर्वांनाच अक्षयचा या सिनेमातील अभिनय पसंत आल्याचे दिसले.

सकाळी ९ च्या शोला आलेले प्रेक्षक अर्ध्या झोपेत होते, मात्र सिनेमागृहातून बाहेर निघताना ते खूश दिसत होते. सिनेमात प्रत्येकवेळी अक्षय कुमार आणि दिवेंद्रु शर्मा यांच्यातील संवादांमुळे सिनेमागृहात एकच हशा पिकतो. ‘मला हा सिनेमा पाहण्यात फारसे स्वारस्य नव्हते. माझा मुलगा आणि नवरा अक्षय कुमारचे फार मोठे चाहते आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत मी हा सिनेमा पाहायला आले. पण हा सिनेमा पाहिल्यानंतर माझं मत पूर्णपणे बदललं,’ असं मत एका महिलेने सिनेमा पाहून झाल्यानंतर दिलं.

दरम्यान, ‘टॉयलेट- एक प्रेम’ कथा सिनेमात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर आणि अनुपम खेर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच भाजपाची सत्ता असणाऱ्या सर्व राज्यांमध्ये हा सिनेमा कर मुक्त करण्यात आला आहे.