सोशल मीडिया हे एक असं माध्यम झालं आहे जिथे एखादी गोष्ट व्हायरल झाल्यावर त्याविषयी नेटिझन्स लगेचच व्यक्त होतात. काही मुद्दे तर इतके उचलून धरले जातात की त्यासंबंधीच्याच चर्चा सर्वत्र पाहायला मिळतात. सध्या असंच काहीसं अभिनेता अक्षय कुमारसोबत घडत आहे. काही दिवसांपूर्वीच महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळी अक्षय कुमारने तिरंगा पकडून मोठ्या उत्साहात भारतीय महिला संघाला पाठिंबा दिला होता. पण, तिरंगा उलटा पकडल्यामुळे त्याला अनेकांच्याच रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

लॉर्ड्स म्हणजे क्रिकेटच्या पंढरीवर भारत विरुद्ध इंग्लंड या संघादरम्यान खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्याचा याची देही याची डोळा अनुभव घेण्यासाठी खिलाडी कुमार पोहोचला होता. पण, सामन्यानंतर सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे त्याच्या आनंदावर विरजण पडलं. तिरंगा उलटा पकडल्याप्रकरणी या अभिनेत्याने सर्वांची माफीही मागितली. पण, त्यावेळी नेमकं काय झालं होतं याचा उलगडा नुकताच त्याने एका कार्यक्रमादरम्यान केला.

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असणारा हा अभिनेता आपल्या जबाबदाऱ्याही तितक्याच कौशल्याने पार पाडतोय. त्यातच त्याला माध्यमांच्या बऱ्याच प्रश्नांचाही सामना करावा लागत आहे. अशाच एका कार्यक्रमात २३ जुलैच्या त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याचा त्याने खुलासा केला आहे. ‘मी झेंड्याची घडी उघडतानाच तो उलटा होता. हे माझ्या लक्षात येण्याआधीच कोणीतरी मागून फोटो काढला’, असं तो म्हणाला. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे सांगतानाच खिलाडी कुमारने आपल्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांची माफीही मागितली.