फॅशन जगतातील एका प्रतिष्ठीत फॅशन वीकचा उल्लेख करण्यास सांगितले तर अनेकजण ‘लॅक्मे फॅशन वीक’ला प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळेल. अशाच या लॅक्मे फॅशन वीकच्या दिमाखदार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. युरोपातील कोस्टा क्रुझ या आलिशान जहाजावर या सोहळयाची सुरुवात झाली असून मॉडेल्स, ग्लॅमर, फॅशन आणि सेलिब्रिटी फॅशन डिझायनर या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढवत आहेत. लॅक्मे फॅशन वीकच्या पहिल्याच दिवशी पार पडलेल्या फॅशन शो मध्ये फॅशन डिझायनर मोनिशा जयसिंगच्या डिझाइन्स सादर करण्यासाठी मॉडेल्स रॅम्पवर उतरल्या होत्या.

लॅक्मे फॅशन वीकच्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेजवर या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. या सगळ्यात सर्वांचेच लक्ष वेधले ते म्हणजे एका ट्रान्सजेण्डर मॉडेलने. फॅशनच्या परिभाषा बदलत असतानाच अंजलीचा रॅम्पवॉक अनेकांचीच प्रशंसा मिळवून गेला. एका सुरेख अशा स्लिट असलेल्या गाऊनमध्ये अंजली क्रुझवरील रॅम्पवर आली आणि तिने सर्वांचीच मने जिंकली. या फॅशन शो या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या प्रसिद्ध फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करण्याचे अंजलीचे स्वप्न साकार झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंजली लामाच्या नावाचा इतका गाजावाजा होण्याचे कारण म्हणजे, अनेकांनाच आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणारी अंजली ही पहिली तृतीयपंथी सौंदर्यवती आहे. काही दिवसांपूर्वीच अंजलीची मॉडेल बनण्यापर्यंतची कथा एले या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

नेपाळमधील नुवाकोट येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अंजलीची कथा रोजच्या जीवनातील वास्तवाचे दर्शन घडवणारीच आहे. ‘मला तर लोक असंही म्हणायचे की, हा मुलगा आहे, मुलीसारखा का वागतो? यावर मी पुन्हा पुन्हा स्वत:ची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मी मुलासारखे कपडेही घालून पाहिले’, असे अंजली एलेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाली होती.

दरम्यान, वयाच्या एका टप्प्यावर असताना अंजली एका हॉटेलमध्ये काम करु लागली, सोबतच ती नेपाळच्या एका वाहिनीवर तृतीयपंथींवर आधारित एक कार्यक्रमही करत होती. कालांतराने ‘ब्लू डायमंड सोसायटी’शी संपर्क साधल्यानंतर तिने स्वत:ची खरी ओळख सर्वांसमोर आणत त्याच अनुशंगाने जगण्याचा निर्णय घेतला. ‘मी २००५ ला तिथून बाहेर पडले. तो न विसरता येण्यासारखा अनुभव होता. त्यावेळी मला ज्या नावांनी संबोधलं जायचं त्याचा उल्लेख मला करायचा नाहीये’, असे म्हणत अंजलीने या मुलाखतीदरम्यान सांगितले की ‘माझ्या कुटुंबात जेव्हा ही परिस्थिती कळली तेव्हा त्यांच्यासाठी मी मेले होते. फक्त माझी आईच माझ्या पाठिशी उभी राहिली होती’, असे अंजलीने स्पष्ट केले होते.