चित्रपट- कलादिग्दर्शक, दिग्दर्शक तसेच निर्माते असे त्रिसूत्री समीकरण असणारे मराठीतील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई! लोकांना प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे देण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यांच्या आगामी ‘ट्रकभर स्वप्न’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना काहीतरी वेगळ देण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपल्या हस्तकौशल्यात तरबेज असणारे नितीन देसाई चित्रपट दिग्दर्शन तथा निर्मितीतही कुशल असल्याचे त्यांच्या हेलो जयहिंद, अजिंठा आणि बालगंधर्व या चित्रपटामधून सिद्ध झाले आहे. चित्रपटाच्या कथानकाला साजेसे लोकेशन, पात्र तसेच इतर सर्व गोष्टींवर विशेष महत्व देणाऱ्या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे मराठीतील दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करणे त्यांची खासियत मानली जाते. ‘ट्रकभर स्वप्न’ या त्यांच्या आगामी चित्रपटात देखील आपला हाच वेगळेपणा जपण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करीत आहे. याविषयी हातात आलेल्या माहितीनुसार कर्जत येथील एन डी स्टुडियोमध्ये ‘ट्रकभर स्वप्न’ या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. नितीन देसाई यांच्या मातोश्रीं आणि कांचन अधिकारी यांच्या हस्ते चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांनी देखील उपस्थिती लावली होती. यात मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार असून, अदिती पोहोनकर, मुकेश रिशी, यतीन कारेकर, स्मिता तांबे आणि सुरेश भागवत हे कलाकार देखील आपापल्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रमोद पवार दिग्दर्शित हा सिनेमा सामान्य मुंबईकरांच्या भावना आणि त्याच्या महत्वाकांक्षेवर आधारित असल्याचे समजते. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येणारा प्रत्येकजण आपल्या सोबत स्वप्न बाळगून येत असतो. जमिनीवर राहताना आकाशात उंच भरारी मारण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक मुंबईकरांच्या भावनांचा वेध घेणा-या या सिनेमाचे प्रशांत खेडेकर यांनी लेखन केले आहे.  ‘ट्रकभर स्वप्न’ या नावातूनच बरेच काही सांगणा-या या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरु असून, राजीव जैन छायाचित्रण करत आहे.
truckbhar swapn