एखादी पाककृती अशी असते जी वर्षांनुवर्ष नवा मसाला लावून, थोडी नव्याने बनवली आणि नव्याने मांडली तर त्याची चव नक्कीच घ्यावीशी वाटते! खाल्ल्यानंतर ती आवडेल न आवडले हा ज्याचा त्याचा प्रश्न. ‘टीटीएमएम’ (तुझं तू आणि माझं मी) पाहताना ही वरची पाककृतीवाली गोष्ट चपखल लागू पडते. आपलं स्वातंत्र्य जपण्याचा अट्टहास असणारी आत्ताची पिढी याच हट्टापायी प्रेम आणि लग्न या दोन विषयांवर गोंधळलेली दिसते. हे गोंधळलेपण अनेक व्यावसायिक हिंदी चित्रपटांतून वेगवेगळ्या पद्धतींनी मांडलं गेलं आहे. महेश भट्ट यांच्या ‘दिल है के मानता नही’पासून ते कालपरवा प्रदर्शित झालेल्या ‘मेरी प्यारी बिंदु’पर्यंत अनेक चित्रपटांतून आलेला हा विषय काही क्लिशे प्रसंगांतून याही चित्रपटात पाहायला मिळतो. मात्र दिग्दर्शक कुलदीप जाधव यांनी वास्तव व्यक्तिरेखा आणि वेगळ्या मांडणीतून हा साचेबद्ध चित्रपटही प्रेक्षकांच्या मनाची पकड सोडणार नाही इतक्या काळजीने रंगवला आहे.

एरवी कोणाचीही भीड न बाळगता मानवी भावभावनांपासून व्यवहारापर्यंत अनेक गोष्टी थेट बोलणारी ही पिढी प्रेम आणि लग्न या विषयावर आली की अडखळते, गोंधळते. आपल्याच मनाचा तळ गाठण्यात अपुरे पडत असताना त्यातून बाहेर पडण्याऐवजी कित्येकदा आपल्या पालकांच्या भावनिक दबावाला बळी पडून सोपे निर्णय घेतले जातात. ‘टीटीएमएम’मध्ये या पिढीचं हे गोंधळलेपण अधोरेखित करत असताना त्यांना त्यातून बाहेर काढण्याऐवजी अनेकदा आई-वडील त्यांच्यावर नेहमीच्या व्यावहारिक जगातल्या शहाणपणाचा दाखला देत नको ते निर्णय घ्यायला कसे भाग पाडतात, यावरही दिग्दर्शकाने बोट ठेवलं आहे. जग भटकायची महत्त्वाकांक्षा असलेल्या जयच्या (ललित प्रभाकर) मागे त्याच्या आईची लग्न करण्याची भुणभुण आणि त्याने घरचा व्यवसाय सांभाळावा यासाठी वडिलांचा त्रागा अशा दोन गोष्टींचा ससेमिरा आहे. (इथे जयला पाहून ‘यह जवानी है दिवानी’ मधील रणबीर हटकून आठवतोच) त्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलेल्या जयला न विचारताच त्याला आपल्याच नात्यातील मुलीबरोबर लग्नाच्या बेडीत अडकवायची योजना घरचे आखतात. त्यातून निदान ज्या मुलीशी लग्न होते आहे तिच्याशी रीतसर बोलून हा प्रश्न सोडवण्यातही जय अपयशी ठरतो तेव्हा पळून जाण्याच्या एकमेव निर्णयाप्रत तो येतो. दुसरीकडे राजश्री (नेहा महाजन) ही अगदी सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरातील मुलगी. तिच्याही मागे वय उलटून चाललं आहे म्हणून आईने लग्नाचा तगादा लावला आहे. मात्र आपल्या पत्रिकेत राजयोग आहे या भाकितावर विश्वास असणाऱ्या राजश्रीला कोणा सोम्यागोम्याशी लग्न करण्यात रस नाही. त्यामुळे तीही घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते.

हे दोघेही गोव्याला जाणाऱ्या बसमध्ये एकत्र भेटतात, एकमेकांशी भांडतात आणि त्याच वेळी काही कारणाने राजश्रीला जयची मदत घेण्यावाचून पर्याय राहत नाही. इथे फ्लॅशबॅक आणि वर्तमानकाळ अशी दोन्हीची सांगड घालत दिग्दर्शकाने कथा पुढे नेली आहे. त्यामुळे त्यातला एकसुरीपणा टाळण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. त्या दोघांचं एका क्षणी एकत्र येणं आणि दुसऱ्याच क्षणी घरच्यांच्या प्रवेशाबरोबर एकत्र येऊनही एकमेकांपासून दूर असणं हे या कथेतलं वळण महत्त्वाचं ठरतं. अर्थात हा चित्रपट फक्त त्या दोघांवर बेतलेला नाही. त्या दोघांबरोबर जोडले जाणारे त्यांच्या घरचे सदस्य हाही या चित्रपटाचा गाभा आहे. त्यांचा एकमेकांमधला संवाद, आशा-अपेक्षा या सगळ्याचा चांगला गोफ बांधला गेला आहे. जय आणि त्याच्या वडिलांचं नातं असेल किंवा राजश्रीचा तिच्या वडिलांबरोबर होणारा संवाद या गोष्टी वास्तवाची कास धरून चित्रपटात उतरल्या आहेत. त्यामुळे आपण सहज या कथेचा भाग होऊन जातो. ललितचा वावर आश्वासक असा आहे. केवळ महिन्याभरात थोडेफार साधम्र्य असलेली प्रेमकथा साकारत असतानाही ललितने अगदी सहज आणि तरीही त्यातलं ग्लॅमर कायम ठेवून जयची भूमिका साकारली आहे. नेहा महाजनही राजश्रीच्या भूमिकेत फिट बसली आहे. मात्र इथेही प्रेमकथा असून रोमँटिक होण्याची संधी दिग्दर्शकाने त्यांना दिलेली नाही. जयच्या आई-वडिलांच्या भूमिकेत विद्याधर जोशी-सविता प्रभुणे आणि राजश्रीचे आई-वडील म्हणून सीमा देशमुख-सतीश पुळेकर या चौघांनीही चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. पुष्कर लोणारकर इथेही नायिकेच्या भावाच्या भूमिकेत भाव खाऊन गेला आहे. सागर कारंडे आणि खुद्द चित्रपटाचा लेखक तेजपाल वाघ हे छोटय़ा भूमिकेतही लक्षात राहतात. इथेही भारत गणेशपुरे आहेत, हे असे अनेक योगायोग आपल्याला जाणवत राहतात. चित्रपटाचं पाश्र्वसंगीतही उत्तम आहे त्यामानानाने गाणी तितकीशी प्रभावी वाटत नाहीत. प्रेमकथेच्या जुन्याच साच्यातून आलेली ही कथा ताज्या मांडणीमुळे प्रेक्षकाला धरून ठेवते. बाकी टीटी (तुमचं तुम्ही) ठरवा..

चित्रपट : तुझं तू माझं मी

  • दिग्दर्शक – कुलदीप जाधव
  • लेखक – तेजपाल वाघ
  • कलाकार – ललित प्रभाकर, नेहा महाजन, सविता प्रभुणे, विद्याधर जोशी, सीमा देशमुख, सतीश पुळेकर, पुष्कर लोणारकर, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, तेजपाल वाघ.