यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक कलाकारांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी कलाविश्वात अनेक चर्चांना उधाण येत आहे. टेलिव्हीजन अभिनेत्री रश्मी देसाईने सुद्धा तिचा पती नंदिश संधू याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पण सध्या रश्मी एका वेगळ्याच चर्चेमुळे गाजत आहे. रश्मी सध्या तिच्या नव्या मालिकेतील सहकलाकाराला डेट करत असल्याच्या चर्चा टिव्ही वर्तुळात रंगत आहेत. लक्ष्य लालवानी या अभिनेत्यासोबत रश्मीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमुळे या चर्चेला उधाण आले आहे.
रश्मीने मात्र याप्रकरणी होणाऱ्या अवाजवी चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी माझ्या मित्रासोबतचे फोटो पोस्ट नाही करु शकत का?’, असा संतापजनक प्रश्न रश्मीने एका वृत्तपत्राशी बोलताना उपस्थित केला. ‘माझ्या जीवनातील कठिण प्रसंगी त्या मित्राने मला फार साथ दिली आहे. पण मला आता त्याच्यासाठीच वाईट वाटत आहे. विनाकारण त्याचे नाव या अफवांमध्ये खेचले जात आहे. मला याविषयी अजून काहीही बोलायचे नाही. लोकांनी आतातरी याबाबतीत लक्ष देणं सोडावं’, अशी निराशाजनक प्रतिक्रीया रश्मीने व्यक्त केली.
‘उतरन’ या गाजलेल्या मालिकेमधून रश्मी प्रसिद्धीझोतात आली होती. या मालिकेच्या सेटवरच तिची आणि नंदिशची ओळख झाली होती. पण काही काळाच्या सुखी वैवाहिक आयुष्यानंतर या दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा मार्ग निवडला.