18-lp-cidसर्फिग करताना एखादा कार्यक्रम दिसला की लोगो न बघता ते चॅनेल कोणते ते सांगता येऊ शकते, इतके त्या कार्यक्रमाचे आणि त्या चॅनलचे गुळपीठ असते. म्हणजे सोनी आणि सूर्यवंशम्..

टेलिव्हिजन वाहिन्यांवर असंख्य कार्यक्रमांचा रतीब सुरू असतो. पण ठरावीकच कार्यक्रम चॅनेलची ओळख होतात. काही वेळेला चॅनेलच्या ब्रॅण्डपेक्षा हा कार्यक्रम मोठा होतो. प्रेक्षकांनाही तो कार्यक्रमच चॅनेल वाटू लागतो. चॅनेलचा चेहरा झालेल्या काही मोजक्या कार्यक्रमांविषयी.

सूर्यवंशम आणि सोनी मॅक्स :

आयपीएल स्पर्धेचा अपवाद सोडला तर सोनी मॅक्सवर अष्टौप्रहर सूर्यवंशम सुरू असतो. सोनी मॅक्स ही चित्रपटांची वाहिनी आहे. साहजिकच तिथे नवे-जुने चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना आहे. मात्र चित्रपटांच्या टंचाईमुळे सूर्यवंशम बाय डिफॉल्ट सुरू असतो. बरे सूर्यवंशम हा काही ऑस्कर विजेता चित्रपट नाही. हिंदीतल्या सूर्यवंशम चित्रपटाचा हा रिमेक आहे. डोके बाजूला ठेवून मनोरंजन होऊ शकतो असा हा चित्रपट. दाक्षिणात्य चित्रपटांत जो मसाला असतो तो इथेही ठासून भरला आहे. तीन तास तुमचे मनोरंजन होऊ शकते. पण एखादी गोष्ट किती वेळा पाहायची यालाही मर्यादा आहेच की. चित्रपट प्रदर्शित करणारी वाहिनी आणि चित्रपट निर्माता यांच्यात करार होतो. त्यानुसार चित्रपट वर्षभरात किती वेळा दाखवण्यात येणार याचे वेळापत्रक ठरलेले असते. साधारण दहा वर्षांसाठी हा करार होतो. सर्वसाधारणपणे वर्षभरातून तीन ते पाच वेळा चित्रपट दाखवण्याचे पक्के होते. थिएटरमध्ये चित्रपट पाहू न शकलेल्या मंडळींसाठी ही मेजवानी असते. कारण घरबसल्या चकटफू चित्रपट पाहता येतो. अर्थात वर्ल्ड प्रीमिअर अशा गोंडस सबबीखाली एवढय़ा जाहिराती दाखवल्या जातात की ब्रेकआधी चित्रपटात काय सुरू होते हेच विसरायला होते. असो.. मुद्दा तो नाही. सूर्यवंशम गेल्या दहा वर्षांत शेकडो वेळा दाखवला गेलाय. सोनी मॅक्स पाहणाऱ्या असंख्य प्रेक्षकांना तो पाठही झालाय. चॅनेल सर्फिग करताना सूर्यवंशम दिसला म्हणजे ते चॅनेल सोनी मॅक्सच अशी प्रेक्षकांना ओळख आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर असंख्य चित्रपट दररोज प्रदर्शित होतात. भारतात हिंदीव्यतिरिक्तही अन्य भाषांतले बहुविध चित्रपट दाखवता येऊ शकतात. एकाच वेळी चार-पाच चित्रपट प्रदर्शित होतात. आणि आवडत्या चित्रपटासाठी वेळ काढेपर्यंत चित्रपट थिएटरमधून निघून गेलेला असतो. इंटरनेटवरच्या टोरंट्समुळे चित्रपट मिळवणे आता सोपे झाले आहे. हवे तेव्हा, हवा तसा चित्रपट घरच्या घरी किंवा स्मार्टफोनमध्ये पाहण्याची सुविधा तंत्रज्ञानाने करून दिली. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या वाहिन्यांचा बाजार अचानक घटला आहे. प्रेक्षकांना चांगले, आशयघन चित्रपट दाखवण्याची संधी असताना सोनी मॅक्सची बांधिलकी आहे सूर्यवंशमशी. बरं ठरावीक वेळेला असे नाही दुपारी, संध्याकाळी, अपरात्री, पहाटे केव्हाही सूर्यवंशम सुरू असतो. समाजमाध्यमांवर त्यावरून झालेले विनोदही ऐकण्यासारखे आहेत. सोनी मॅक्सवर सूर्यवंशम लागते का सूर्यवंशम वाहिनीवर मध्ये मध्ये सोनी मॅक्स लागते असा थेट सवाल प्रेक्षक करतात. अभिनयाचे बादशाह अमिताभ बच्चन यांचा या चित्रपटात डबल रोल आहे. साहजिकच अमिताभच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी आहे. पण अमिताभजींचे आणखी असंख्य चांगले चित्रपट दाखवणे शक्य आहे पण सोनी मॅक्सचा हट्ट एकच. बहुतेक सूर्यवंशमच्या रिमेकचा सिक्वेल आला की थांबेल बहुतेक.

सीआयडी आणि सोनी :

मध्यंतरीच्या काळात सोनी वाहिनीवरचे कार्यक्रम आटले. तेव्हा सीआयडी त्यांच्या मदतीला धावून आले. एखादी मालिका १७ वर्षे सुरू राहते हेच मुळात आश्चर्य आहे. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत यांच्यासह वाढता वाढे त्यांची टीम सोनी टीव्हीचा आधारवड आहे. पार पहिल्या एपिसोडपासून अगदी परदेशात सीआयडी जाऊन इनव्हेस्टिगेशन करतात तिथपर्यंत- लाखो एपिसोड्सनी सोनीची वेळ भरून गेली. प्रेक्षकांना प्रश्न पडतो की यांच्याकडे केसेस तरी किती येतात? संकल्पना आटत कशा नाहीत? खून, दरोडा, अपहरण, लूट असे गुन्ह्य़ांचे प्रकार आहेत ढोबळमानाने. पण १७ वर्षे या दहा-बारा मुद्दय़ांवर तासातासाचे एपिसोड्स रचतात राव. साध्या संस्थांमध्येही अप्रायजल होते. लोकांची पदोन्नती होते, पण सीआयडी अपवाद आहे. एसीपी एसीपच आहेत आणि त्यांचा स्टाफही. बदल झालाय तो डॉ. साळुंखेंमध्ये आणि त्यांच्या लॅबमध्ये. इंडियन आयडॉल सुरू झाल्यावर सीआयडीला विश्रांती मिळाली पण आयडॉल संपले आणि आयडल झालेले सीआयडीचे पुनरुज्जीवन झाले. आताही सोनीच्या ताफ्यात नव्या मालिका आहेत, जुन्याही काही सुरू आहेत पण सीआयडीसारखी हुकमत कोणाचीच नाही. अख्खा दिवसच्या दिवस सीआयडी सुरू ठेवण्याची वेळ सोनीवर आली होतीय. पण गुरुचरित्राचे करावे तसे सीआयडीचे पारायण करणारे भक्तगण आहेत. १७ वर्षे सीआयडी पाहता पाहता काही प्रेक्षकही तज्ज्ञ झालेत. त्यांना सीआयडी टीममध्ये अ‍ॅड केल्यास आश्चर्य वाटायला नको.

लाइफ ओके आणि सावधान इंडिया :

ज्या चॅनेलचे नावच मुळी लाइफ ओके असे आटपाटनगरीसारखे आहे तिथे काही तणावाचे असेल असे वाटत नाही. पण योगायोगाने याच चॅनेलवर बहुतांशी वेळ ‘सावधान इंडिया’ सुरू असते. सत्य घटनांवर आधारित नाटय़ रूपांतर असलेली ही मालिका. एक निवेदक किंवा निवेदिका जिथे कहाणी घडते तिथेच उभे राहून बोलते किंवा बोलतो. त्यांचे झाले की केस सुरू होते. अनेकदा यात फसवणुकीच्या केसेस असतात. हुंडा, शारीरिक छळ, लैंगिक शोषण, मारहाण, चोरी, लूट या स्वरूपाच्या केसेस असतात. त्या पाहताना आपल्यालाही कसे वागावे, कोणाशी काय बोलावे, काय बोलू नये याची शिकवण मिळते. पण हे तासन्तास पाहणे जरा अजीर्णच आहे. नाही का? भारतात सरळ काही घडतेच नाही. प्रत्येक घरात, प्रत्येक विषयावर फसवणूक होते असेही वाटू लागते आपल्याला. समोरचा निरागसपणे सांगत असेल तरी शक येतो आता. सीरियल पाहण्याचा अतिरिक्त फायदा म्हणजे-भारतभरातली असंख्य शहरे जशी आहेत तशी पाहता येतात. तिथली माणसे, घरे, भाषा कसा सेटअप आहे हे समजते. कारण बहुतांशी वेळी मालिकेचे शूटिंग घटना घडलेल्या परिसरातच केले जाते. पोलिसांकडे नोंद होणाऱ्या प्रत्येक केसचे स्क्रिप्ट होते की काय, अशी शंकाही मनी येते. कैक तास स्लॉट व्यापणाऱ्या या मालिकेने चॅनेलचे आर्थिक आणि टीआरपी लाइफ ओके केलेले असावे.

बिग बॉस- कलर्स म्हणजे रंग :

ज्या वाहिनीच्या नावात रंग आहेत, तिथे बहुढंगी कार्यक्रम पाहायला मिळतील अशी अपेक्षा असते. पण कुठले काय- बहुतांशी वेळ बिग बॉस नामक नौटंकी प्रकारात जातो. साधारणत: ओवाळून टाकलेली माणसे या शोमध्ये असतात. त्यांना म्हणे लोणावळ्याच्या अत्याधुनिक बंगल्यात ठेवले जाते. प्राणी-पक्ष्यांना ठेवतात तसे. त्यांनी गुण्यागोविंदाने राहावे अशी अपेक्षा असते, प्रत्यक्षात तिथे रणकंदन सुरू असते. तृतीयपर्णी वर्गातले, प्रसिद्धीलोलुप, अभिनयापेक्षा अंगविक्षेप करणारे असे असंख्य निरुपद्रवी एकत्र येतात. त्यांच्यावर म्हणे बिग बॉस नजर ठेवून असतो. बरे दर आठवडय़ाला भाई येतात. अहो सलमानभाई. त्यांच्यासमक्ष एकाला डच्चू मिळतो. वाइल्ड कार्डही मिळते कधी कधी. या मंडळींवर म्हणे २४ तास कॅमेरा असतो. चारचौघांत करू न शकणाऱ्या लीला काही जण तिथे करून घेतात. तेवढेच खाद्य मिळते एंटरटेन्मेंट शोज्ना. पहिल्या सीजनच्या वेळी भारीभक्कम प्रसिद्धी मिळालेली या प्रकाराला. पण नंतर लोक अक्षरश: पकले. आचरट प्रकार कुटुंबीयांसमवेत पाहण्यासारखा नाही याची खात्रीही पटली अनेकांना. आता कुठलाही इन्फिनिटी हंगाम सुरू आहे. दर्जा कितीही सपक असला तरी चॅनेलसाठी हा शो जिव्हाळ्याचा आहे. चॅनेल लोकांनी नाही बघितला तरी हरकत नाही पण एंटरटेन्मेंट शोज्मध्ये किमान दहा मिनिटं फुटेज दिसते यावरच चॅनेलवाले खूश आहेत. कसे आहे भाई असले की गर्दी जमते. २४ तास कॅमेरा सुरू असतो, त्यामुळे पुढचे शेकडो दिवस काय दाखवायचे याची सोय हा शो करून देतो.

शाखा नाइन- टीव्ही नाइन :

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जाते. बातम्या, वृत्तांकन यांच्या माध्यमातून बदल घडावा, समाजातल्या वाईट गोष्टी समोर याव्यात, त्या बंद हव्यात, वेगळी वाट चोखाळणाऱ्या आणि निस्पृहपणे काम करणाऱ्या व्यक्तीचे कार्य लोकांसमोर यावे अशा काही किमान अपेक्षा असतात. सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी सामान्य माणूस नाडलेला असतो. घर, संक्रमण शिबिरे, स्वच्छता, वैैद्यकीय सुविधा, पाणी, रस्ते, वीज अशा मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष कराव्या लागणाऱ्या सामान्य माणसासाठी टीव्ही नाइन वाहिनीने शाखा नाइन हा कार्यक्रम सुरू केला. पत्रकार दीप्ती लेले आणि शाखा नाइनच्या चमूने मुंबईसह असंख्य शहरे पिंजून काढली. ज्यांचा आवाज कधीही माध्यमांपर्यंत पोहचत नाही त्यांना समोर आणले, बोलते केले. जिथे पोहचणेही मुश्कील आहे अशा ठिकाणी ते पोहोचले. ग्लॅमरस मुंबईतली समस्यांनी ग्रस्त नगरे त्यांनी शोधून काढली. तिथल्या स्थानिक राजकारण्यांना समोर आणून जाबही विचारला. परिसराचा आणि प्रश्नाचा सखोल अभ्यास, अशक्य वाटणाऱ्या ठिकाणी पोहोचणारा कॅमेरा आणि दीप्ती लेले यांचे उत्तम सूत्रसंचालन यांच्या बळावर शाखा नाइन कार्यक्रमाने टीआरपीचे शिखर गाठले, पण त्याहीपेक्षा लोकांचा विश्वास जिंकला. समस्या सोडवली जाईल माहिती नाही पण ती किमान राज्यकर्त्यांपर्यंत पोहचावी यासाठी सामान्य माणसे शाखा नाइनच्या लोकांना गाठू लागले. चॅनेलच्या ब्रॅॅण्डइतकी शाखा नाइन कार्यक्रमाची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली. ठरवले तर चांगले काम करता येते, हे या कार्यक्रमाने सिद्ध केले. आजही हा कार्यक्रम सुरू आहे, फक्त त्याची टीम बदलली आहे.

ही यादी बरीच आहे. वर्चस्वाची दुसरी बाजू एकसुरीपणा असते. वाहिन्यांच्या पसाऱ्यात एखादीच गोष्ट लार्जर दॅन लाइफ मोठे होणे धोक्याचेही आहे. सकस कार्यक्रमांच्या टंचाईमुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे सातत्याने नवे काही तरी देणे शक्य होत नाही. अशा वेळी आहे तेच खेचत न्यावे लागते. चॅनेलचा नाइलाज होतो आणि प्रेक्षकराजाचाही. या खेचाखेचीत काही कट्टर चाहते निर्माण होतात तर अनेकदा टीकाकारांची संख्या वाढते. सुवर्णमध्य गाठणे शक्य होत नाही आणि आपल्यासमोर वर उल्लेखलेल्या किंवा तत्सम मालिकेचा मारा सुरू होतो.
पराग फाटक
response.lokprabha@expressindia.com