खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकलने रुपेरी पडद्यावरील अभिनयातून काढता पाय घेतला असला तरी ती सध्या लेखिका आणि निर्माता या भूमिकेतून ती एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. त्यामुळे अक्षय आणि ट्विंकल ही जोडी नेहमीच प्रकाशझोतात असते. अक्षय आणि ट्विंकलला नितारा आणि अर्णव अशी दोन मुले आहेत. ट्विंकल अनेकदा तिच्या लेकीचे म्हणजेच निताराचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत असते. मात्र, ट्विंकलने शेअर केलेल्या बऱ्याचशा फोटोमध्ये नताराचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. कधी तिचा चेहरा अर्धाच दिसतो. तर कधी ती चेहऱ्यावर मास्क घालून दिसते. काही दिवसांपूर्वीच ट्विंकलने नितारा आणि तिच्या मैत्रिणीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. ट्विंकल आपल्या लेकीचे अनेक फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत असली, तरी ती आपल्या मुलांना रुपेरी पडद्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते.

ट्विंकलला जेव्हा एका मुलाखतीमध्ये लेकीला रुपेरी दुनियापासून दूर ठेवण्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ट्विंकलने मुलांना प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचे कारण सांगितले. ट्विंकल म्हणाली की, नितारा ही मोठी आहे. त्यामुळे तिचे वैयक्तिक आयुष्य जपण्याचा मी प्रयत्न करते. यावेळी ट्विंकलने मुलगा अर्णवबद्दल देखील सांगितले. मी अर्णवचे फोटो कधीही पोस्ट करत नाही. तो ज्यावेळी माझ्यासोबत असतो त्यावेळी अनेकजण त्याचे फोटो घेतात. त्यावेळी मी कोणालाही फोटो घेण्यापासून रोखत नाही. प्रसिद्धीचे परिणाम समजून घेऊन पालक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडण्याचे प्रयत्न करतो. त्यांच्यामध्ये स्वत:ला हाताळण्याची जाणीव होत नाही तोपर्यत त्यांना प्रसिद्धीपासून दूर ठेवावे यासाठी प्रयत्नशील असेन, असे ट्विंकल म्हणाली.

अक्षय कुमार आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही ट्विंकल खन्नाने केली आहे. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे यादेखील मुख्य भूमिकेत दिसतील.