आक्षेपार्ह ट्विट केल्याने गायक अभिजीत भट्टाचार्यचे Abhijeet Bhattacharya ट्विटर अकाऊंट बंद (सस्पेंड) झाल्यानंतर त्याने ट्विरला राष्ट्रविरोधी, हिंदूविरोधी आणि मोदीविरोधी असे म्हटले आहे. अभिजीत वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सोमवारीच जेएनयूतील विद्यार्थी संघटनेतील महिला पदाधिकारी शहला रशीद यांच्याविरोधात त्याने असभ्य भाषेचा वापर केला होता. यानंतर शहला यांनी अभिजीतचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी ट्विटरकडे तक्रार करण्याचे आवाहन केले होते. याशिवाय अभिजीतने आणखी एका महिला ट्विटर युजरवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती.

वाचा : ट्विटरच्या मायाजालातून सोनू निगमचा काढता पाय

ट्विटरने मंगळवारी संध्याकाळी अभिजीतचे अकाऊंट बंद केले. त्यावर अभिजीत म्हणाला की, ट्विटर राष्ट्रविरोधी, हिंदूविरोधी, मोदीविरोधी, सैन्यविरोधी आणि दहशतवादाच्या समर्थकांचे व्यासपीठ आहे. सर्व दहशतवाद्यांना शिक्षा करायला हवी. हे जिहादींचे ट्विटर आहे. आम्ही केवळ गायक नसून, देशाचा आवाज आहोत. राष्ट्रविरोधी असणाऱ्यांना आम्ही खुलेपणाने विरोध करू. ट्विटर आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतोय.

शहला रशीद यांनी भाजप नेत्यांशी संबंधित सेक्स स्कँडलबद्दल ट्विट केले होते. त्यावर अभिजीत आणि काही युजर्सने त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांची खिल्ली उडवली होती. अभिजीतने त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यावर एका महिलेने विरोध करताच त्यांच्याबद्दलही त्याने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

वाचा : टिवटिव भोवली, गायक अभिजीतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड