बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये ढिंच्याक पूजाची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली. आपल्या विचित्र गाण्यांनी पूजाने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ‘बिग बॉस’च्या घरात अशाच वादग्रस्त स्पर्धकांची गरज असल्याने तिचा गृहप्रवेश होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती. जेव्हा पूजा बिग बॉसमध्ये आली तेव्हा सलमानने तिची खूप मस्करी केली. तुझं नाव ढिंच्याक पूजा का आहे, असा प्रश्न सलमानने तिला विचारला. त्यावर आपले खरे नाव पूजा जैन असल्याचा खुलासा तिने केला.

यानंतर सलमानने पूजाला गाणे गायलाही सांगितले. पूजाने यावेळी तिचे ‘सेल्फी मैंने ले ली आज’ हे गाणे गायले. सलमानने तिच्या या गाण्याची नक्कल करण्याचाही प्रयत्न केला. तसेच तुम्ही या गाण्यांना एवढी प्रसिद्धी का दिली? असा उपरोधिक प्रश्नही प्रेक्षकांना विचारला. पूजा घरात आल्यानंतर आकाश खूपच खूश होता. तर दुसरीकडे अर्शीने इतर स्पर्धकांसोबत तिची ओळख करून दिली. पण यावेळी हिना पूजाशी साधी बोलायलाही गेली नाही.

हिनाच्या या वागणुकीमुळेच ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. तू साधे पूजाचे स्वागतही केले नाहीस आणि तू आर्शीला संस्कार शिकवतेस, असे प्रश्न तिला विचारले जाऊ लागले. पूजाही एक माणूसच आहे, तू तिचा अपमान करु शकत नाहीस, असे एकाने म्हटले. तर दुसरीकडे ‘बिग बॉस’मधील एण्ट्रीनंतर पूजादेखील ट्विटरवर ट्रोल झाली. ट्विटरकरांना सुरूवातील घरातील स्पर्धकांची दया आली.