बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि मि.परफेक्टशनिस्ट आमिर खान या दोघांच्या अभिनय कौशल्याबाबत बोलावे तितके कमीच आहे. बॉलीवूडला लाभलेले हे दोन्ही कलाकार त्यांच्या कामाबाबत नेहमीच चोखंदळ राहिले आहेत. काम करण्याची त्यांची स्वतःची अशी वेगळी शैली आहे. मात्र, काही बाबतीत या दोघांमध्ये साम्य आढळून येते याचा खुलासा ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केला.
नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटामध्ये अमिताभ यांनी काम केले होते. त्यानंतर आता ते ‘दंगल’च्या निमित्ताने आमिरसोबत काम करत आहेत. अमिताभ आणि आमिरसोबत काम करताना कोणता फरक जाणवला, असा प्रश्न नितेश यांना विचारला असता ते म्हणाले, मी खूप भाग्यवान आहे. या दोघांची  तुलना करणे अयोग्य आहे. दोघही सेटवर पूर्ण तयारीनिशी येतात आणि ते खूप मेहनतीदेखील आहेत. विशेष म्हणजे, दोघेही कामाबाबत सहज समाधानी होत नाहीत. एखाद्या लहान मुलामध्ये जसा उत्साह आणि ऊर्जा असते तसाच उत्साह अमिताभ व आमिरमध्ये असतो. ते तुमच्याशी कामाबाबत चर्चा करून त्याबाबत असलेला त्यांचा विचार सांगतात. पण शेवटी दिग्दर्शक सांगेल तेच ते करतात. दोघही त्यांच्या कामाच्या बाबतीत सारखेच आहेत, असे तिवारी म्हणाले.
सध्या नितेश तिवारी आमिरसोबत ‘दंगल’चे चित्रीकरण करत आहेत. दंगल हा चित्रपट महावीर फोगट या प्रसिद्ध कुस्तीपटूच्या जीवनावर आधारित आहे.