जाहिरात क्षेत्रातील रवी जाधव यांनी चित्रपटाच्या मायावी क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या चित्रपटांचा यशस्वी दिग्दर्शक म्हणून आपले नाव कोरले. त्यापाठोपाठ ‘बीपी’अर्थात बालकपालक आणि ‘टाइमपास’-एक आणि दोन या चित्रपटांनी त्याला यशाच्या शिखरावर नेले. आता रवी जाधव यांच्या ‘न्यूड’या नव्या चित्रपटाची चर्चा आणि उत्सुकता मराठी चित्रपट वर्तुळात आहे.
रवी जाधव म्हणजे ‘हिट’ चित्रपट, वेगळा विषय व आशय आणि मनोरंजनाचा मसाला असे समीकरण गेल्या काही वर्षांत तयार झाले. ‘बायोस्कोप’च्या निमित्ताने चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन कवितांवरील चित्रपटाचा जो वेगळा प्रयोग केला त्यात रवी जाधव यांचा ‘मित्रा’ हा चित्रपटही होता. ‘समलैंगिक’ संबंधांवरील चित्रपटाचा हा विषय वेगळा होता. त्यामुळे रवी जाधव यांचे आता नवीन काय? अशी उत्सुकता नेहमीच प्रेक्षकांना असते.
सध्या रवी जाधव पहिल्या हिंदी चित्रपटाच्या ‘बँजो’च्या गडबडीत असले तरी नव्या मराठी चित्रपटाचेही काम सुरू आहे. हा नवा चित्रपट ‘न्यूड’ विषयाशी संबंधित असून ‘ट्विटर’, ‘फेसबुक’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘न्यूड’ची चर्चा सुरू झाली आहे. आगामी ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर स्वत: रवी जाधव यांनी त्यांच्या ‘फेसबुक’ खात्यावरून ‘व्हायरल’केले आहे. माझ्या ‘बॅन्जो’ या पहिल्या हिंदी चित्रपटाची तयारी जोरात सुरू आहे. पण त्याचबरोबर मी दिग्दर्शित करत असलेल्या माझ्या आगामी मराठी चित्रपटाचे कामही गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सुरू आहे. चित्रपटाच्या नावावरून हा विषय वेगळा असल्याचे लक्षात येईल. काम कठीण आहे म्हणूनच ते करायचा हा एक प्रयत्न असल्याचे रवी जाधव यांनी ‘फेसबुक’वर जाहीर केले आहे. चित्रपटातील कलाकार आणि अन्य माहिती याबाबत मात्र त्याने गुप्तता पाळली आहे. ‘जाहिरात’ ही ६५ वी कला असल्याचे म्हटले जाते. मूळचा जाहिरात क्षेत्रातीलच असलेल्या रवी जाधव यांनी या पासष्ठाव्या कलेचा आधार घेत चित्रपटाची चर्चा तर घडवून आणायला सुरुवात केली आहे.