मालिकांमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग होत असतात. अलीकडे याचं प्रमाण वाढलंय. प्रयोग करण्याचं प्रमाण वाढल्यामुळे छोटा पडदा आणि मोठा पडदा यातलं अंतरही कमी होऊ लागलं. मग या प्रयोगांमध्ये अ‍ॅक्शन सीन्स, बोल्ड सीन्स असो किंवा बॉलीवूडकरांची झालेली गर्दी असो; छोटा पडदा मोठी झेप घेऊ लागलाय हे खरंय. वेगवेगळ्या गोष्टी अजमावू पाहण्यामध्ये आणखी एका गोष्टीचा समावेश आहे तो म्हणजे अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानाचा. सध्या काही मालिकांमध्ये अ‍ॅनिमेशनचा वापर करताना दिसून येतो. विशेषत: पौराणिक मालिकांमध्ये याचा वापर मोठय़ा प्रमाणात होताना आढळून आलंय. अ‍ॅनिमेशनचा वापर करणाऱ्या हिंदी मालिकांमध्ये आता एका मराठी मालिकेचाही समावेश आहे. कलर्स मराठीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत ग्राफिक्सचा वापर केला जातो. पण, यात आता भर पडतेय ती गणपतीच्या सोंडेची. सुरुवातीला बाप्पाची सोंड करताना काही प्रयोग केले गेले. ते यशस्वीही झाले होते. पण, काही महत्त्वाच्या कारणांमुळे त्यात आता बदल केला आहे. गणपतीची सोंड आता थ्रीडी अ‍ॅनिमेशनच्या रूपात प्रेक्षकांना दिसते.

सुरुवातीला अ‍ॅनिमॅट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करत गणपतीची सोंड तयार केली होती. कालांतराने गणपतीची भूमिका साकारणाऱ्या स्वराज येलवे या बालकलाकाराला त्रास होऊ लागला. म्हणून मालिकेचे निर्माते आणि चॅनलने मिळून या सोंडेत बदल करण्याचं ठरवलं. खऱ्या सोंडेपेक्षा अ‍ॅनिमेटेड सोंड वापरण्यावर एकमत झालं. याबाबत मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारे सांगतात, ‘गणपती बाप्पा मोरया या मालिकेतल्या स्वराजला सुरुवातीला तयार केलेल्या सोंडेचा त्रास होऊ लागला. ती सोंड जड असल्यामुळे त्याच्या मानेवर आणि डोक्यावर भार येत होता. आम्ही तातडीने ती सोंड वापरणं थांबवलं. त्यानंतर लेटेक्सपासून तयार केलेली कृत्रिम सोंड वापरू लागलो, पण त्यानेही स्वराजला त्रास होत होता. सतत डिंक लावावा लागत असल्यामुळे त्याच्या नाकावर रॅशेस येत होते. तसंच ती सोंड खरी वाटत नव्हती. त्यामुळे आम्ही थोडं आणखी पुढे गेलो आणि अ‍ॅनिमेटेड सोंड तयार करण्याचा निर्णय घेतला.’

अ‍ॅनिमॅट्रॉनिक्स हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या सोंडेसाठी लाखो रुपये खर्च केले होते. पण, निर्माते आणि चॅनलसाठी पैशांपेक्षा बालकलाकार अधिक महत्त्वाचा होता. ‘माझी आणि माझ्या बाबांची म्हणजे महेश कोठारे यांची करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणूनच झाली आहे. त्यामुळे प्रत्येक बालकलाकाराबद्दल आम्हाला प्रेम वाटतं. आमच्यासाठी बालकलाकार नेहमीच महत्त्वाचा असतो. अ‍ॅनिमेटेड सोंड करण्यात कलर्स मराठीचीही तितकीच साथ मिळाली. एखादी निर्मिती संस्था एखादा निर्णय घेत असते त्या वेळी त्याला चॅनलची साथ मिळणं खूप महत्त्वाचं असतं’, असं आदिनाथ सांगतात. दैनंदिन मालिकांच्या एपिसोड्सची बँक करणं तसं थोडंसं कठीण असतं. आठवडय़ातून सहा दिवस मालिका प्रसारित होत असते. त्यांची बँक करण्यासाठी मेहनतही तितकीच करावी लागते. ‘गणपती बाप्पा..’ची टीम ही मेहनत घेतेय. या मालिकेचं शूट करताना गणपतीची सोंड नसते. स्वराजच्या नाकावर फक्त मार्कर्स म्हणजे मोशन सेन्सर्स असतात. वीएफएक्स करताना गणपतीला सोंड नेमकी कुठे लावावी यासाठी ते मार्कर्स असतात. टीव्हीवर दिसणारा एक एपिसोड संपूर्ण तयार होण्यासाठी साधारण आठ ते दहा दिवस लागतात. म्हणजे या मालिकेचं सरासरी दहा दिवस आगाऊ काम सुरू असतं. याविषयी आदिनाथ सांगतात, ‘डेली सोपची इतकी बँक अलीकडे फार बघायला मिळत नाही. पण, आम्हाला बँक करावीच लागते. त्यासाठी चॅनलही सहकार्य करत असतं. मालिका अधिकाधिक उत्तम होण्यासाठी आम्ही काही प्रयोग करतोय आणि चॅनल त्याला योग्य ती साथ देतंय.’ थ्रीडी अ‍ॅनिमेटेड सोंडेचा खर्च परदेशी तंत्रज्ञान वापरून केलेल्या सोंडेच्या साधारणपणे दुप्पट आहे.

‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. विविध चॅनल्सवर पौराणिक, ऐतिहासिक, संतांवरील मालिका सुरू असतानाच गणपतीवर एखादी मालिका सुरू झाल्यामुळे प्रेक्षकांसाठी खरंतर ती मेजवानीच ठरली आहे. ‘सिया के राम’, ‘अशोका’, ‘महाबली हनुमान’, ‘सूर्यपुत्र कर्ण’, ‘सिया के राम’, ‘महाभारत’ या हिंदी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय मल्हार’, ‘तू माझा सांगाती’ या मराठी मालिकांमुळे प्रेक्षकांनाही सास-बहू ड्रामापेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळतंय. यापैकी काही मालिकांमध्ये ग्राफिक्स, इफेक्ट्सचा वापर केला जातो. या मालिकांचे सेटही मोठे आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया’मध्येही ग्राफिक्सचा वापर केला जातो. पण, आता यात अ‍ॅनिमेटेड सोंडेची भर पडली आहे. ही मालिका सुरू होऊन साधारण चार महिने झाले. या चार महिन्यांत मालिकेने चांगलीच पकड घेतली आहे.

मालिका लोकप्रिय व्हायला पाहिजे, कलाकारांनी असं करायला हवं, तसं करायला नको अशी असंख्य बंधन असलेल्या निर्माती संस्था, चॅनल्स अस्तित्वात असताना कोठारे व्हिजन आणि कलर्स मराठी यांनी कलाकाराला प्राधान्य दिलं आहे. ‘गणपती बाप्पा..’ या मालिकेतल्या बालकलाकाराला प्राधान्य देत आर्थिक बाबींचा विचार न करता सोंडेमध्ये बदल केले. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेच. पुढेही विविध गोष्टी, घटना, प्रयोगशील एपिसोड्स दाखवत मालिका आणखी लोकप्रिय होईल असे दिसून येते.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com