पंडित तानसेन यांच्या स्वरात अशी जादू होती की, राग दीपक गायल्यानंतर तप्त झालेले वातावरण थंड करण्यासाठी ते मेघ मल्हार गायचे आणि पाऊस पडत असे अशी वर्णने कथा, कादंबऱ्या अगदी चित्रपटात देखील किंचित अतिशयोक्ती वाटावी, अशा पद्धतीने रेखाटलेली आपण नेहमीच पाहतो.

मात्र,  महाराष्ट्र मंडळ, दुबई च्या ‘वारसा सुरांचा’ या कार्यक्रमात जेव्हा प्रथमेश लघाटे आणि आर्या आंबेकर या नव्या पिढीच्या दमदार कलाकारांनी मे महिन्याच्या रखरखीत उन्हाळ्यात तमाम दुबईकरांवर आपल्या सुरांची अशी बरसात केली की, तमाम श्रोतेगण या पावसात चिंब भिजून निघाले. कार्यक्रमाच्या समर्पक शीर्षकाला पुरेपूर न्याय देणारी गाण्यांची अचूक निवड, जोडीला उत्कृष्ट गायक, गायिका त्यांना वादकांची लाभलेली सुरेल संगत आणि सोबतीला उत्स्फूर्त आणि ओघवत्या निवेदनाची पखरण. ज्यांना ही सुरमयी रम्य सायंकाळ अनुभवता आली नाही, त्यांना हा किंचित कल्पनाविलास वाटेल, मात्र ज्या रसिकांनी ही सायंकाळ अनुभवली त्यांच्यासाठी ही एक अविस्मरणीय भेट होती.

dubai-1

 

आपला वारसा पुढच्या पिढीने चालवावा हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. या कलाकारांनी आपण हा वारसा चालविण्यासाठी सक्षम आहोत हेच या कार्यक्रमातून दाखवून दिले. कलाकारांची अदबशीरता ही या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले. दिग्गज कलाकारांची गाणी आपण गात आहोत याची जाणीव ठेवून या कलाकारांनी त्यांचा आदर राखत त्यांची नक्कल न करता अत्यंत मनस्वीपणे नव्या दमाच्या कलाकारांनी अंत:करणापासून आपल्या सुरांनी दिग्गज कलाकारांना मानवंदना देत कार्यक्रमाला एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले.

सुरांचा वारसा जपणाऱ्या कित्येक प्रसंगांचे खुमासदार विवेचन करत कधी कोपरखळ्या मारत, नर्मविनोदाची पेरणी करत आणि आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत विघ्नेश जोशी यांनी केले. त्यांचे निवेदन म्हणजे चिंब पावसात भिजताना हळूच एखाद्या आडोशाला जाऊन कोसळणाऱ्या पावसाचे दर्शन घेण्यासारखे होते.

-तुषार वि. कर्णिक