क्रिकेटच्या देवाचे अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे दर्शन मिळावे, अशी प्रार्थना त्याचे जगभरातील चाहते करत असतात. सचिनला याची देही याची डोळा पाहता यावे, यासाठी क्रिकेट जगतातीलच नव्हे तर सर्वस्तरामध्ये क्रेझ आहे, असे म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही. सचिनचे प्रत्यक्षात दर्शन होणे ही खास गोष्टच असते. अभिनेता वरुण धवनही याला अपवाद राहिला नाही. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वरुणलाही सचिनच्या भेटीचे अप्रुप असल्याचे दिसून आले. सचिनचे दर्शन झाल्यानंतर त्याने या भेटीवळीची उत्सुकता ट्विटरच्या माध्यमातून दाखवून दिली आहे.  वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच्या चित्रीकरणावेळी वरुणला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भेटण्याची संधी मिळाली.

मुंबईतील महबूब स्टुडिओमध्ये मंगळवारी आलिया भट्ट आणि वरुण धवन आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ च्या प्रसिद्धीचे चित्रीकरण करत होते. त्याचवेळी या स्टुडिओमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी आला होता. विराटचा जिवलग मित्र असणाऱ्या वरुणला ज्यावेळी ही बातमी कळली तेव्हा त्याला सचिनच्या भेटीची उत्सुकता निर्माण झाली. त्याने स्वत:चे चित्रीकरण सोडून चक्क सचिनला भेट दिली. क्रिकेटच्या देवाला भेटण्याची उत्सुकता दाखविण्यासाठी त्याने सचिनच्या व्हॅनिटी व्हॅनसमोर काढलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सचिनच्या भेटीविषयी एका संकेतस्थळाशी बोलताना वरुण म्हणाला की, सचिनला भेटताना मला देवाची प्रार्थना करत असल्याचा भास झाला. लहानपासूनच मी सचिनचा चाहता आहे. एवढेच नाही तर मी सचिनची पूजा करतो. सचिनचा दर्जा देवाचा आहे हे सांगण्याची मला गरज वाटत नाही, असे सांगत सचिनच्या भेटीला त्याने देवाच्याच भेटीची उपमा दिल्याचे दिसून आले. भारतीय क्रिकेट जगतात धावांचा विक्रमी डोंगर रचणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देशातीलच नव्हे तर जगभरातील अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्या जीवनावरील चित्रपट ‘सचिन- अ बिलियन ड्रीम्स’ येत्या २६ मे ला प्रदर्शित होणार आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेच त्याच्या फेसबुक अकाऊंटद्वारे एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती. ‘गेल्या बऱ्याच काळापासून मला सर्वजण जो प्रश्न विचारत होते हे आहे त्याचे उत्तर. ही तारीख राखून ठेवा..’ असे कॅप्शन देत सचिनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर या चित्रपटासंबंधीचे एक पोस्टरही शेअर केले होते. तब्बल दोन दशके क्रिकेटच्या मैदान गाजविणारा सचिन चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.