महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भारतात काम करत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीच्या मागणीविषयी मत व्यक्त करताना; कलाकारांवरील बंदीमुळे दहशतवाद थांबत असेल असे जर सरकारला वाटत असेल तर सरकारने जरूर तसे करावे अशी प्रतिक्रिया अभिनेता वरुण धवनने दिली. सोमवारी पार पडलेल्या ‘नाइट लाइफ कन्वेंशन’ पुरस्कार सोहळ्यात तो बोलत होता. मी सरकारच्या नियमांचे पालन करतो. सरकारच्या विचारांप्रमाणे झाले पाहीजे. मी त्याचे समर्थन करतो. देशातील सरकारला माझे पूर्ण समर्थन आहे, अशी भावना त्याने यावेळी बोलताना व्यक्त केली. कलाकारांवरील बंदीमुळे दहशतवाद थांबण्यास मदत होत असेल तर सरकारला जरूर असे करायला हवे. परंतु यावर चर्चा करून सरकारने निर्णय घ्यावा असेदेखील तो म्हणाला. जम्मू-काश्मीरमधील उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतात काम करत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी मनसेने ४८ तासांची मुदत दिली होती. या दहशतवादी हल्ल्याविषयी बोलताना वरुण म्हणाला, ” देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांविषयी माझ्या हृदयात दु:खाची भावना आहे. हा हल्ला खूप भयानक होता.” सध्या तो आलिया भटसोबतच्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

उरी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याची धमकी दिल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान गुपचुप देशाबाहेर पडल्याचे वृत्त आहे. सध्या त्याचा भारतात परण्याचा विचार नसल्याचेदेखील समजते. ज्या पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी सांगण्यात आले होते त्यात फवाद खानचे नाव सर्वात वर होते. ‘ए दिल हैं मुश्किल’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमाचादेखील तो हिस्सा नव्हता.

लवकरचं सुरू होणाऱ्या ‘कॉफी विथ करण’ या प्रसिध्द ‘शो’च्या पहिल्या भागात फवाद येणार असल्याचे वृत्त होते. त्यातदेखील आता बदल करण्यात आला आहे. आता पहिल्या भागात शाहारुख खान आणि आलिया भट दृष्टिस पडतील. मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी कलाकारांना सुरक्षेचा विश्वास दिला असला तरी देश सोडून जाण्याची धमकी मिळाल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांमध्ये असुरक्षीततेची भावना वाढली आहे.