‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवन आता चांगलाच यशस्वी झाला आहे असं म्हणावं लागेल. जिथे मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटत होते तिथे वरुणचे चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहेत. वरुणचे यावर्षी प्रदर्शित झालेले ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘जुडवा २’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. याच लोकप्रियतेची आणि कामगिरीची दखल देत हाँगकाँगच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात त्याचा मेणाचा पुतळा स्थापन करण्यात येणार आहे.

याची अधिकृत घोषणा हाँगकाँगच्या मादाम तुसाँ संग्रहालयाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर केली आहे. ‘बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा पहिला मेणाचा पुतळा मादाम तुसाँमध्ये स्थापित होणार आहे. २०१८ च्या सुरुवातीला वरुण या पुतळ्याचं अनावरण करणार,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

या ट्विटला वरुणने रिट्विट करत लिहिलं की, ‘ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. स्वत:च्या मेणाचा पुतळा पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. धन्यवाद!’ यासोबतच पुतळ्यासाठी मोजमाप घेतानाचे काही फोटोसुद्धा त्याने शेअर केले आहेत. ‘मादाम तुसाँ, मी लवकरच येतोय,’ असं कॅप्शन त्याने यातील एका फोटोला दिलं आहे.

वाचा : मुलगा- मुलगी एकत्र फिरण्यात गैर काय?- माहिरा खान

कलाकारांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेत मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये आजवर बऱ्याच कलाकारांचे मेणाचे पुतळे साकारण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये बी- टाऊन कलाकारांची संख्या जास्त आहे. पण वरुण मात्र यामध्ये सर्वांत तरुण कलाकार आहे.