चित्रपट क्षेत्राशी निगडीत कोणतीही पाश्र्वभूमी नसताना इंटरनेटच्या मदतीने निर्मिती

मुंबईत भरणाऱ्या पहिला आंतरराष्ट्रीय भयलघुपट महोत्सावसाठी वसईतील तरुणांनी बनविलेल्या ‘अंजानी’ या लघुपटाची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्राशी निगडित कसलीही पाश्र्वभूमी नसताना वसईतल्या या तीन तरुणांनी हा लघुपट तयार केला आहे.

वसईत राहणारे सचिन मेंडिस हे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात. त्यांनी ‘अंजानी’ हा आठ मिनिटांचा लघुभयपट तयार केला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्राविषयी कोणतीही पाश्र्वभूमी नसताना इंटरनेटवरून माहिती घेऊन त्यांनी हा लघुपट बनविला आहे. या लघुपटाला अ‍ॅन्सन तुस्कानो याने आवाज आणि पाश्र्वसंगीत दिले आहे. तर रमेदी येथील सॅल्विअर डिमेलो या तरुणाने कॅमेरा आणि एडिटिंगचे काम केले असून सचिन मेंडिस यांनी या लघुपटात स्वत: काम केले आहे.

यापूर्वी सचिन मेंडिस यांनी ‘८ पिस पिझ्झा’ ही लघुकथा लिहिली होती. त्यावर कुणी तरी लघुपट काढला आणि तो खूप गाजला. त्यामुळे या वेळी स्वत: त्यांनी लघुपट बनविण्याचा निर्णय घेतला.

प्रथमच आयोजन

मुंबईत लघुभयपटांचे प्रथमच आयोजन करण्यात आले असून मे महिन्यात हा महोत्सव होणार आहे. यासाठी जगभरातून ३३ लघुपट यात सहभागी झाले आहेत.

वसईतल्या तरुणांमध्ये कलागुण आहेत. त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या प्रतिसादामुळे आनंद झाला.

सचिन मेंडिस, दिग्दर्शक, ‘अंजानी