हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार हे काही दिवसांतच त्यांचा ९४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. पण, त्याआधीच त्यांच्या उजव्या पायाला सूज आल्यामुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांची पत्नी सायरा बानो यांनी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटद्वारेही ही माहिती देण्यात आली आहे.

सायरा बानो यांनी यासंदर्भात बॉम्बे टाईम्सशी बोलताना सांगिकते की, ‘मी असेही त्यांना नेहमीच्या तपासणीसाठी रुग्णालयात नेण्याच्या विचारात होते. पण त्यांच्या पायाला आलेल्या सूजेमुळे मी तातडीने रुग्णालय गाठले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून सर्दीचाही त्रास होत आहे. दिलीप साहेबांच्या आरोग्याच्या अगदी लहानातल्या लहान तक्रारीच्या बाबतीत मी कोणताही हलगर्जीपणा करत नाही’, असे म्हणाल्या. ‘सध्या ते डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. मी आशी आशा व्यक्त करते की काळजी करण्यासारखे काहीच कारण नसावे आणि त्यांच्या वाढदिवसापूर्वीच मी त्यांना घरी नेऊ शकेन’, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान गेल्या वर्षभरामध्ये वाढते वय आणि प्रकृती खालावल्याच्या कारणांमुळे दिलीप कुमार यांना बऱ्याचदा रुग्णालयात दाखत करण्यात आले होते. दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाते. दिलीप साहेबांच्या आजारपणामध्ये सायरा बानो त्यांची फार काळजी घेतात हे तर सर्वच जाणतात. त्यामुळे सध्या दिलीप कुमार यांनी प्रकृती सुधारावी अशीच चाहत्यांची इच्छा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोहम्मद युसुफ ते दिलीप कुमार बनण्यापर्यंतचा त्यांच्या प्रवास फारच रंजक आहे. जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘मुघल-ए-आझम’, ‘राम और श्याम’, ‘कर्मा’ आणि अशा अनेच चित्रपटातून दिलीप साहेबांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचा वावर आणि राजेशाही थाट पाहता त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचा कोहिनूर म्हणूनही संबोधले जाते.