* आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात खास त्यांचे गाणे सादर झाले तेव्हा त्या अवघ्या १२ वर्षांच्या होत्या..
*आकाशवाणीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी त्या १९ वर्षांच्या होत्या..
* नागेशबुवा खळीकर यांच्याकडे काही काळ शास्त्रीय संगीत तर हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे त्या नाटय़संगीतही शिकल्या ..

ravi03पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अभिनयाने त्यांच्या गाण्यावर मात केली आणि गाणे मागे पडले. तसे झाले नसते तर आज कदाचित ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे नाव ज्येष्ठ गायिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित झाले असते..‘पुनर्भेट’च्या निमित्ताने दया डोंगरे यांचा हा अप्रकाशित पैलू गप्पांच्या ओघात समोर आला. शास्त्रीय संगीत किंवा नाटय़ संगीतात त्यांनी ‘करिअर’ केले नसले तरी संगीताची ही आवड त्यांनी आजही जोपासली आहे. वयाच्या ७७ व्या वर्षांत असलेल्या दया डोंगरे दररोज सकाळी अर्धा ते पाऊण तास रियाज करतात.
अभिनय क्षेत्रातील सुरुवातीच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, अभिनयाचा वारसा मला माझ्या आईकडून (यमुताई मोडक) मिळाला. माझ्या आईने त्या काळात हौशी रंगभूमीवर ‘किचकवध’, हाच मुलाचा बाप’ आदी नाटकातून काम केले होते. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका शांता मोडक ही माझी आत्या. बालगंधर्वाच्या नाटक कंपनीत तिने नाटकातून काम केले होते. त्यामुळे लहानपणापासून माझ्यावर अभिनयाचे संस्कार झाले. मी १६ वर्षांची असताना मो. ग. रांगणेकर यांच्या ‘रंभा’ या नाटकात काम केले होते. त्या नाटकातील माझे काम पाहून ज्योत्स्ना भोळे यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. घरातून आईचे प्रोत्साहन होतेच आणि लग्नानंतर माझे पती शरद डोंगरे यांचे. पतीचे संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळाला. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अभिनयात मी जे काही करु शकले ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच. अभिनयाची ही आवड मला राष्ट्रीय नाटय़ विद्यालयापर्यंत (एनएसडी) घेऊन गेली. मी आणि सई परांजपे अशा आम्ही दोघींनी एकाच वेळी ‘एनएसडी’ला प्रवेश घेतला. तिथे खूप काही शिकायला मिळाले. दिल्लीला असतानाच सई परांजपे व अरुण जोगळेकर यांच्या ‘नाटय़द्वयी’ या नाटय़संस्थेतून ‘नांदा सौख्य भरे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘इडापिडा टळो’,‘तुझी माझी जोडी जमली’ ही नाटके केली.
ravi02  त्यांच्या ‘नांदा सौख्यभरे’ या नाटकाचा प्रयोग मुंबईत साहित्य संघात होता. दामू केंकरे त्या प्रयोगाला आले होते. नाटक पाहिल्यानंतर त्यांनी ‘बिऱ्हाड वाजलं’ या व्यावसायिक नाटकात काम करणार का, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. त्यांनी होकार दिला. या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी आणि दिग्दर्शन दामू केंकरे यांचे होते. या नाटकात त्या एक गाणेही गायच्या. या नाटकात दत्ता भट, शांता जोग या मंडळींबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. दया डोंगरे यांच्या आयुष्यात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’चे ‘लेकुरे उंदड जाली’ हे नाटक मैलाचा दगड ठरले. व्यावसायिक रंगभूमीवर या नाटकाने त्या प्रस्थापित झाल्या. वसंत कानेटकर यांचे लेखन आणि जीतेंद्र अभिषेकी यांचे संगीत असा योग ‘लेकुरे’च्या निमित्ताने जुळून आला. गद्य आणि पद्य यांचा संयोग असलेल्या मराठी रंगभूमीवरील या वेगळ्या प्रयोगात काम कराल का? अशी विचारणा त्यांना झाली आणि त्यांनी ही संधी स्वीकारली. दया डोंगरे यांच्यासह श्रीकांत मोघे त्या नाटकात मुख्य भूमिकेत होते. पुढे ‘अखेरचा सवाल’ ‘माणसाला डंख मातीचा’, ‘माता द्रौपदी’ (दया डोंगरे ‘गांधारी’ आणि विजया मेहता ‘द्रौपदी’ होत्या.), ‘चि. सौ. का. चंपा गोवेकर’, ‘अमानुष’ आणि ‘संकेत मीलनाचा’ ही नाटके त्यांनी केली. फक्त दोन पात्रे असलेले ‘संकेत मीलनाचा’ हे नाटकही गाजले. याच नाटकासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे ‘शांता आपटे स्मृती सुवर्णपदक’ मिळाले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात त्यांनी ‘येसुबाई’ साकारल्या. अर्थात ही त्यांची बदली भूमिका होती. पण मा. दत्ताराम यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करायची संधी मिळाल्याने त्यांनी ती स्वीकारली. ‘मंतरलेली चैत्रवेल’ या नाटकाचा विषय निघाला की त्या आजही हळव्या होतात. सातारा येथील नाटकाचा प्रयोग आटोपून सर्व मंडळी कोल्हापूरला पुढील प्रयोगाठी बसने जात होती. या बसला भीषण अपघात झाला. अपघातातून दया डोंगरे वाचल्या पण त्यांचे सहकलाकार जयराम हर्डीकर आणि शांता जोग यांचा त्या अपघातात मृत्यू झाला. ही आठवण व तो प्रसंग आजही त्यांच्या अंगावर काटा आणतो.
ravi04दया डोंगरे यांच्या अभिनयप्रवासात मुंबई दूरदर्शनवरील ‘गजरा’ या कार्यक्रमाला विशेष स्थान आहे. सुरेश खरे यांचे लेखन आणि दया डोंगरे यांचे निवेदन त्यात असायचे. या कार्यक्रमानेही खूप प्रसिद्धी मिळवून दिल्याचे त्या सांगतात. मराठी प्रेक्षकांबरोबरच अमराठी लोकांमध्येही हा कार्यक्रम लोकप्रिय होता. निखळ विनोद आणि करमणूक असे त्याचे स्वरूप होते. या कार्यक्रमामुळे ‘गजरा क्वीन’ अशी त्यांना ओळख मिळाली. याबाबतची एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या, एकदा ग्रॅण्ट रोड येथे जाण्यासाठी मी माटुंगा रोड स्थानकात आले. स्थानकातील पादचारी पूल उतरत असतानाच गाडी सुटली. मला ती गाडी मिळणे शक्यच नव्हते. पण काही क्षणातच गाडी थांबली आणि मला त्याच गाडीत चढायला मिळाले. ही किमया ‘गजरा’ कार्यक्रमाने घडविली होती. धावतपळत उतरूनही मला गाडी पकडता आली नाही हे गाडीच्या मोटरमनने पाहिले. त्या अमराठी मोटरमनला ‘गजरा’ कार्यक्रमामुळे मी परिचित होते. केवळ त्या ओळखीमुळे त्यांनी सुरू झालेली गाडी काही क्षण पुन्हा थांबविली आणि ‘मॅडम मैं आपका प्रोग्रॅम देखता हूँ, हमें अच्छा लगता हैं’अशी त्यांची दादही मिळाली.
ललिता पवार यांच्यानंतर महाराष्ट्रात ‘सासू’ म्हणून दया डोंगरे यांचेच नाव घेतले जाते. दया डोंगरे म्हणजे ‘खाष्ट सासू’ असे समीकरण तयार झाले. सचिन पिळगावकर यांच्या ‘मायबाप’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा ‘सासू’ साकारली. ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’ किंवा दूरदर्शनवरील ‘आव्हान’ या मालिकेतील त्यांची ‘सासू’ गाजली. करडा आवाज, डोळ्यांतील जरब आणि अभिनयकौशल्याच्या जोरावर सर्वसामान्य प्रेक्षकांना मनात आपल्याविषयी भीती, तिरस्कार निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या. ती त्यांच्या अभिनयाला मिळालेली पावती होती. ‘सासू’ साकारताना माझ्या डोळ्यांपुढे कोणीही नव्हते किंवा मी कोणाचे अनुकरणही केले नाही. मी माझ्या पद्धतीने ‘सासू’ साकारली, असे त्या सांगतात. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने ‘मी लहान असताना मला तुमच्या डोळ्यांची खूप भीती वाटायची’ असे सांगितल्याची आठवण त्या सहज सांगून जातात. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘उंबराठा’, ‘कुलदीपक’, ‘आत्मविश्वास’ हे त्यांचे आणखी काही चित्रपट. दूरदर्शनवरच अधिकारीबंधूंच्या ‘बंदिनी’ मालिकेत तसेच ‘वेडय़ांचा बाजार’मध्ये मी वृद्ध स्त्रीची भूमिका केली. आजवर रंगविलेल्या खाष्ट, दुष्ट आणि कजाग ‘सासू’पेक्षा या भूमिका वेगळ्या होत्या. कोणतीही भूमिका करताना कलाकाराला त्या भूमिकेत शिरण्याबरोबरच बाहेरही पडता आले पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या निरीक्षणातून मी माझ्या ‘भूमिका’ रंगविल्या असे त्यांनी सांगितले. दूरदर्शनवरच्या ‘स्वामी’ मालिकेत त्यांनी साकारलेल्या ‘गोपिकाबाई’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन आणि गजानन जहागीरदार यांचे दिग्दर्शन यातून एक छान मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मराठीप्रमाणेच हिंदीत त्यांनी काम केले. जब्बार पटेल यांच्या ‘सुबह’ (मराठीतील उंबराठा), अमोल पालेकर यांच्या ‘आश्रय’मध्ये त्या होत्या. ‘नकाब’ चित्रपटात ऋषी कपूरच्या तर ‘दौलत की जंग’ चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका त्यांनी केली. पण हिंदीत त्या विशेष रमल्या नाहीत.
डोळ्यांच्या स्नायूंवरील नियंत्रण जाऊन पापण्या आत वळतात त्या आजाराला ‘एण्ड्रोपियॉन’ असे म्हणतात. त्यांच्या वाटय़ाला हा आजार आला. या आजारात डोळ्यांना उजेड, वारा अजिबात सहन होत नाही. यामुळे त्यांना नाटक, चित्रपट, मालिकांमधून काम करणे शक्यच नव्हते. १९९० मध्ये ‘चार दिवस सासूचे’ हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट. डोळ्यांच्या या आजारामुळे त्यांना सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली. सध्या दूरचित्रवाहिन्यांवरील काही मोजक्या मालिका त्या आवर्जून पाहतात. मालिकांमधील ज्या कलाकारांचे काम त्यांना आवडते त्यांचा दूरध्वनी क्रमांक मिळवून त्या स्वत: त्यांच्याशी बोलतात, त्यांना शाबासकी देतात. त्यांच्या कामाचे कौतुक करतात. बसमधून एकदा प्रवास करताना बसच्या वाहकाने, ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक मी २५ वेळा पाहिले’ किंवा ‘काय दुष्ट बाई आहे ही, अशा बाईच्या घरात कोण मुलगी आपली सून म्हणून देईल,’ अशी पुण्यातील एका नाटय़प्रयोगाच्या वेळी मिळालेली प्रतिक्रिया त्यांना अधिक मोलाची वाटते. मी मोजक्याच भूमिका केल्या. पण ज्या केल्या त्या जीव ओतून आणि मन लावून केल्या. त्यामुळे आज इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या मी लक्षात राहिले आहे. सर्वसामान्य लोकांचे मिळालेले हे प्रेम माझ्यासाठी खूप मोठी शिदोरी असून हे समाधान व आनंद अवर्णनीय असल्याचे त्या सांगतात. माझ्या सुदैवाने मला चांगले नाटककार, दिग्दर्शक आणि सहकलाकार मिळाले, याचाही त्या आवर्जून उल्लेख करतात.
दया डोंगरे यांना दोन विवाहित कन्या. मोठी मुलगी संगीता ही मुंबईत त्यांच्या घराजवळच राहते तर धाकटी अमृता बंगलोर येथे असते. कन्या, जावई आणि नातवंडे अधूनमधून येऊन-जाऊन असतात. दोन वर्षांपूर्वी त्यांचे पती शरद डोंगरे यांचे आकस्मिक निधन झाले. त्या दु:खातून त्यांनी स्वत:ला सावरले आहे. टापटीप व शिस्तीच्या भोक्त्या असलेल्या दया डोंगरे गप्पांच्या शेवटी, हातीपायी धड असतानाच ‘त्याचे’बोलावणे यावे, असे अगदी सहजपणे सांगून जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधानी, आनंदी आणि कृतार्थतेची भावना असते..
शेखर जोशी

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी