हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी आणि वैजयंतीमाला यांनी चेन्नईत पार पडलेल्या एका कार्यक्रमाला नुकतीच हजेरी लावली होती. चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने, नृत्यकौशल्याने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या दोन्ही अभिनेत्रींना एकाच मंचावर पाहून उपस्थितांमध्येही उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळालं. हेमा मालिनी यांनी कार्यक्रमातील एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत या प्रसंगीचा आनंद व्यक्त केला. डान्स स्टेज शो 'सिनर्जी'च्या निमित्ताने या दोघी एकत्र आल्या होत्या. हेमा मालिनी या कार्यक्रमाच्या आयोजक मंडळाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर, वैजयंतीमाला या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला योगगुरु रामदेव बाबा यांनीसुद्धा हजेरी लावली होती. यासंबंधीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हेमा मालिनी यांनी वैजयंतीमाला यांना नेहमीच गुरुचं स्थान दिलं आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला गुरुतुल्य असलेल्या व्यक्तीसोबत मंचावर उपस्थित असणं ही त्यांच्यासाठीसुद्धा एक महत्त्वपूर्ण बाब होती हे नाकारता येणार नाही. वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे 'हे' आहेत 'इन्कम सोर्स' हेमा मालिनी आणि वैजयंतीमाला या दोघीही फार चांगल्या नृत्यांगना असून विविध ठिकाणी त्या या कलेचा प्रचार करत असतात. 'सिनर्जी'मध्येही पार पडलेल्या 'इंडो जॉर्जियन डान्स बॅलेट- सुखिशविली'च्या वेळीसुद्धा त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. जॉर्जियासोबत हिंदी चित्रपटसृष्टीचे घनिष्ट संबंध आहेत. अगदी राज कपूर यांच्यापासून ही परंपरा चालत आल्याचं पाहायला मिळालं आहे. १९५४ मध्ये राज कपूर यांनी जेव्हा जॉर्जियाची राजधानी त्बिलीसीला भेट दिली होती. त्यानंतर 'जॉर्जिया नॅशनल बॅलेट- सुखिशवीली' या डान्सग्रुपला त्यांनी भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. हेमा मालिनी यांनीसुद्धा हीच परंपरा सुरु ठेवत 'सिनर्जी'मध्ये त्यांना आमंत्रित केलं होतं.