प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी शुक्रवारी काही शिवीगाळ करणा-या फोलोअर्सना ट्विटरवरून डिलीट केल्यानंतर त्यांना वादाला सामोरे जावे लागले. ‘काही शिवीगाळ करणारे कुत्रे मला फॉलो करत असून मी त्यांना डिलीट केले आहे. दूध का दूध पानी का पानी,’ अशा आशयाचे ट्विट आशा भोसले यांनी केले होते.
ट्विटरवर आक्षेपार्ह भाषा वापरणा-या आणि घाणेरड्या प्रतिक्रिया देणा-यांवर आशा भोसले संतापल्या होत्या. त्यांचा उल्लेख त्यांनी शिव्या देणारे कुत्रे (अॅब्युसिव्ह कुत्ते) असा केला. आशा भोसले यांनी केलेले हे ट्विट पाकिस्तानला उद्देशून असल्याचा समज झालेल्या त्यांच्या काही फॉलोअर्सनी त्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यातून नवा वाद सुरु झाला. या प्रकारानंतर आशा भोसले यांनी आपली बाजू मांडणारे ट्विट केले. त्या ट्विटमध्ये आशा म्हणाल्या की, शिवीगाळ करणारं कोणीही असू शकतं. मी शिवीगाळ करणारे कुत्रे असे म्हणाले. पाकिस्तानचं नाव घेतलं का? मग पाकिस्तानी का नाराज होत आहेत? कोणीही शिवीगाळ करू शकतं.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ‘ सर्जिकल स्ट्राईक’नंतर दोन्ही देशांदरम्यानचे वातावरण तापलेले आहे. याचाच परिणाम सोशल मिडीयावरही दिसत असून दोन्ही देशांच्या नेटिझन्समध्ये शाब्दिक युद्ध पेटलेले पाहावयास मिळतेय. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतात काम करत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्यासाठी अल्टिमेटम जाहीर केले होते. त्यानंतर भारतातील सर्व पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडला. त्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत ते काही दहशतवादी नसल्याचे वक्तव्य केले.