बॉलीवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘रंगून’ चित्रपटातून कंगना रणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खान हे त्रिकूट दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी जागविण्यास सज्ज झाले आहेत. नुकतेच या चित्रपटातील ‘ये इश्क है’ हे प्रेमगीत प्रदर्शित करण्यात आले आहे. गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे तुम्हाला मंत्रमुग्ध करून जाईल.

‘ये इश्क है’ हे गाणे चित्रपटातील मुख्य कलाकार कंगना रणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणे पाहता कंगना आणि शाहिद यांनी आतापर्यंतचे सर्वाधिक बोल्ड सीन दिल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सेन्सॉर बोर्डाची पर्वा न करता या गाण्यात प्रणयदृश्यं दाखविण्यात आली आहेत. गाण्यात तुम्हाला कंगना आणि शाहिद यांची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळेल. जगाची पर्वा न करता प्रेमात आकंत बुडालेले प्रेमीयुगुल यात आपल्याला कंगना आणि शाहिदच्या रुपात पाहायला मिळतात. गाण्याच्या मध्यात कंगनाच्या प्रेमात पडलेला सैफ तिला शाहिदशी रोमान्स करण्यापासून थांबवू शकत नाही.

[jwplayer sPPOdHFV]

गुलजार यांच्या शब्दांना अरिजीतच्या आवाजाने योग्य असा न्याय दिला आहे. पण, त्याचसोबत या गाण्यात कॅमे-याचा वापर ज्याप्रकारे करण्यात आलाय ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. यातील दोन मुख्य दृश्यं लक्षवेधक आहेत. पहिले दृश्य म्हणजे कंगना मेणबत्त्या पेटवत असते ते आणि दुसरे दृश्य म्हणजे कंगना झोपलेली असताना शाहिद तिच्या अंगावरील जखमेला स्पर्श करतो. ही दोन्ही दृश्य गाणं पाहताना लक्ष खेचून घेतात. चित्रपटात कंगनाने अभिनेत्रीची, शाहिदने जवानाची तर सैफने निर्मात्याची भूमिका साकरली आहे. रंगून चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होईल.

दरम्यान‘रंगून’ चित्रपटाच्या सेटवर काही दिवसांपूर्वी कंगना रणौत आणि शाहिद कपूर यांच्यात वाद सुरु असल्याचे समोर आले होते. विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाव्यतिरिक्त शाहिद आणि कंगना एकमेकांकडे पाहत देखील नसल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. चित्रिकरण झाल्यानंतर दोघे आपापल्या व्हॅनिटी व्हनमध्ये जाऊन बसायचे असे बोलले जात होते. त्यामुळे चित्रिकरणावेळीच्या दोन कलाकारांमधील तणावाचा चित्रपटाच्या प्रसिद्धीवर परिणाम होण्याचे संकेत वर्तविण्यात आले होते. मात्र आता या चर्चेला शाहिदने पूर्णविराम दिला आहे. कंगनासोबत कोणताही वाद नसल्याचे शाहिद कपूरने स्पष्ट केले. तसेच आगामी ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैफ अली खान आणि कंगना रणौतसोबत दिसणार असल्याचेही तो म्हणाला. दीपिका पदुकोणच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूडपटाच्या सेलिब्रिशन पार्टीमध्ये शाहिदने चित्रपटातील सहकलाकार कंगना रणौतशी वाद नसल्याचे सांगितले. आमच्या दोघांच्यात कोणतीही समस्या नसल्यामुळे सैफ आणि कंगना ज्या ठिकाणी प्रसिद्धीसाठी हजेरी लावतील, त्या ठिकणी जाण्यास मी तयार असेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.