क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री, मॉडेल हेजल किच काही दिवसांपूर्वीच चंदिगढ येथे विवाहबद्ध झाले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेले हे जोडपे त्यानंतर गोव्याला पोहोचले. येथे या दोघांचेही काल हिंदू धार्मिक परंपरांअंतर्गत पुन्हा लग्न झाले. त्यानंतर आता दिल्लीला त्यांच्या लग्नाचे दणक्यात रिसेप्शन होणार आहे.

युवराज आणि हेजल हे अभिनेत्री-क्रिकेटर जोडपे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत तर आहेच. पण त्याचसोबत आणखी अभिनेत्री-क्रिकेटर जोडी यादरम्यान चर्चेत आली आहे. अर्थातच, ती म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. युवी-हेजलच्या गोव्यात झालेल्या लग्नाला विराटने अनुष्कासह उपस्थिती लावली होती. हे प्रेमीयुगुल गोव्याला एकाच विमानाने पोहचले होते. तेव्हाही सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या होत्या. युवी-हेजलच्या चंदीगढ येथील लग्नाला विराट-अनुष्का जाऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी दुपारी गोव्यात उपस्थिती लावली. या नव दाम्पत्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मुकेश-अनिता अंबानी, क्रिकेटर रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका सजदे, झहीर खान आणि आशिष नेहरा यांनी उपस्थिती लावली होती. युवराजची वरात तर अगदी धुमधडाक्यात काढण्यात आली. विराट कोहली आणि इतर क्रिकेटर मंडळींनी वाजतगाजत नवरोबाला मंडपापर्यंत नेले. इतकेच नाही तर, पार्टीनंतर अनुष्का आणि विराटनेही एकत्र नृत्य केले. अनुष्काने ‘झिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातील ‘सेनोरिटा’ या गाण्यावर ठेका धरला. तर विराटने त्याच्या गंगम स्टाइलमध्ये नृत्य केले.

https://www.instagram.com/p/BNiIflrA0U0/

सध्या, या दोघांचा नव दाम्पत्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही दोन्ही जोडपी फोटोत सुंदर दिसत आहेत यात तिळमात्र शंका नाही. गोव्यात लग्न झाल्यानंतर दिल्लीत युवी-हेजलने रिसेप्शन ठेवले आहे. त्यावेळीही विराट-अनुष्का एकत्र हजेरी लावतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युवराजच्या लग्नानंतर वैवाहिक आयुष्यासाठी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या दरम्यान, भारतीय संघात युवराजचा सहकारी राहिलेला सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने युवीला एक सल्ला देऊ केला आहे. पण हा सल्ला क्रिकेटशी संबंधित नसून वैवाहिक जीवनाशी निगडीत आहे. एक विवाहित पुरूष म्हणून गंभीरने नुकतेच विवाहबद्ध झालेल्या युवीला वैवाहिक जीवनात उपयोगी पडेल असा सल्ला क्रिकेटींग अंदाजात दिला. गौतम गंभीरला युवराजच्या संगीत कार्यक्रमात उपस्थित राहता आले नसले, तरी त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून युवीला शुभेच्छा दिल्या. गंभीरने आपल्या ट्विटर हॅण्डलवर युवराज आणि हेजलचा संगीत कार्यक्रमातील फोटो ट्विट केला आहे. गौतम ट्विटरवर म्हणाला की, ‘युवीने आपल्या शेरवानीच्या आत ‘चेस्टगार्ड’ लावलंय असं वाटतंय, पण मित्रा वैवाहिक जीवनात पडणाऱया बाऊन्सरपासून बचावासाठी अद्याप कोणताही चेस्टगार्ड तयार करण्यात आलेला नाही.’