बॉलीवूडमधील लखलखाट, प्रसिद्धी आणि पैसा याबरोबरच तेथील काळी बाजू फारशी समोर येत नाही. बॉलीवूडमधील कलाकारही याबाबत उघड बोलण्यास फारसे उत्सुक नसतात. कधी तरी प्रसार माध्यमांद्वारे एखादी घटना लोकांपुढे येते. त्यानंतर या घटनेवर काही काळ चर्चा सुरू राहते आणि पुन्हा सारे थंड होते. बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन हिने मात्र अलीकडेच एका कार्यक्रमात बॉलीवूडमध्ये आपल्याला असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले.
बॉलीवूडमध्ये सत्य बोलण्याचे धाडस खूप कमी कलाकार दाखवितात. स्पष्टपणे बोललो आणि कोणी दुखावले गेले तर.. या विचारातून बऱ्याचदा आपले मत स्पष्टपणे मांडले जात नाही. बॉलीवूडसारख्या अवाढव्य उद्योगात सर्व काही सुरक्षित नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण ते उघडपणे कोणी बोलत नाही. पण विद्या बालन त्याला अपवाद ठरली आहे. बॉलीवूडमधील तीन गोष्टी तिला भीतिदायक वाटतात, असे तिने सांगितले.
‘डार्क थिंग्ज’ या कादंबरी प्रकाशन सोहळ्याला विद्या बालन उपस्थित होती. या वेळी बॉलीवूडमधील कोणत्या गोष्टी तुला भीतिदायक वाटतात? या प्रश्नावर विद्याने, आमच्याबद्दल प्रत्येक लहान-मोठय़ा गोष्टींबद्दल लिहिण्यात येते, तसेच आमच्या प्रत्येक गोष्टीवर बारीकपणे लक्ष ठेवले जाते. त्यामुळेच बॉलीवूडमध्ये आम्हा प्रत्येकालाच असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. चित्रीकरण संपल्यानंतरचा रिकामा झालेला स्टुडिओ आणि मध्यरात्री सुरू झालेली पार्टी या गोष्टीही भीतिदायक असल्याचे मत विद्याने व्यक्त केले.
विद्या बालन सध्या सुजॉय घोष याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालनबरोबर ‘बीग बी’ अमिताभ बच्चन व नवाजुद्दिन सिद्दिकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.