भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके या मराठी व्यक्तीने रोवली. फाळके यांची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेतील चित्रपटात बॉलीवूड अर्थात हिंदीतील काही मोजक्याच अभिनेत्रींनी काम केले आहे. तर काही जणींनी ‘पाहुणी कलाकार’ म्हणून हजेरी लावली आहे. त्यामुळे बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांनी किंवा अभिनेत्रींनी प्रादेशिक भाषेतील विशेषत: मराठी चित्रपटात काम केले की ती चर्चेची आणि कौतुकाची बाब ठरते. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन आता ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम करत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांनी आपल्या स्वत:च्या नृत्यशैलीचा स्वतंत्र ठसा उमटविला त्या भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात विद्या बालन ‘गीता बाली’ची भूमिका करत आहे. त्यानिमित्ताने विद्या बालन हिच्याशी केलेली खास बातचीत..
मराठी चित्रपटाला किंवा त्यातील कलाकारांना विशेषत: मराठी अभिनेत्रींना बॉलीवूडमधील अभिनेत्रींच्या तुलनेत फारसे ‘ग्लॅमर’ नसते. त्यामुळे काहीच मराठी अभिनेत्रींनी बॉलीवूडचा रुपेरी पडदा गाजविला. अलीकडच्या काळात माधुरी दीक्षित, ऊर्मिला मातोंडकर यांचा अपवाद वगळला तर बॉलीवूडमध्ये दाक्षिणात्य, पंजाबी अभिनेत्रींचेच वर्चस्व मोठय़ा प्रमाणात दिसून येते. बॉलीवूडमधील एखाद्या आघाडीच्या अभिनेत्रीने मराठी चित्रपटात काम केले किंवा करणार असेल तर ती चर्चेची बातमी ठरते आणि बॉलीवूडचा मोठा पडदा गाजवलेल्या मराठी अभिनेत्रींनी आत्तापर्यंत मराठीत काम न केल्याच्या पाश्र्वभूमीवर ते ठळकपणे समोरही येते. त्यामुळे बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांनी किंवा अभिनेत्रींनी प्रादेशिक भाषेतील चित्रपटात विशेषत: मराठी चित्रपटात काम करणे ही विशेष बाब म्हटली पाहिजे. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके या मराठी व्यक्तीने रोवली. फाळके यांची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेतील चित्रपटात बॉलीवूड अर्थात हिंदीतील काही मोजक्याच अभिनेत्रींनी काम केले असून काही जणींनी ‘पाहुणी कलाकार’ म्हणून हजेरी लावली आहे.
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम करते आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांनी आपल्या स्वत:च्या नृत्यशैलीचा स्वतंत्र ठसा उमटविला त्या भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात विद्या बालन ‘गीता बाली’ची भूमिका करते आहे. तर भगवान दादांच्या भूमिकेत अभिनेता मंगेश देसाई आहे. चित्रपटातील काही दृश्यांचे आणि गाण्यांचे चित्रीकरण नुकतेच गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत पार पडले. विद्या बालन त्यात सहभागी झाली होती. ‘एक अलबेला’साठी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन कशी काय तयार झाली? या प्रश्नानेच विद्या बालनशी गप्पांना सुरुवात झाली. विद्या म्हणाली, रंगभूषाकार विद्याधर भट्टे हे खूप चांगल्या परिचयाचे आहेत. ‘परिणिता’, ‘मुन्नाभाई’ आणि अन्य काही चित्रपटांसाठी ते माझे रंगभूषाकार होते. त्यांच्याशी मराठी चित्रपटाविषयी गप्पा व्हायच्या. संधी मिळाली तर मला मराठी चित्रपटात काम करायला नक्की आवडेल, असे मी भट्टे यांना सांगितले होते. भगवान दादा यांच्या जीवनावर असलेल्या ‘एक अलबेला’ या चित्रपटात ‘गीता बाली’ची भूमिका असून त्याबाबत त्यांनी सांगितले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी ही भूमिका आणि चित्रपटाची कथा मला ऐकविली. भगवान दादांचा ‘अलबेला’ हा एक गाजलेला चित्रपट असून त्याच्याशी संबंधित काही दृश्ये व गाणी या चित्रपटात आहेत. या चित्रपटात ‘गीता बाली’ची भूमिका करायला मिळणे हे माझ्यासाठी ‘औत्सुक्याचे’ होते. त्यामुळे मला विचारणा झाल्यानंतर मी काम करण्यास होकार दिला. चित्रपटाचे सहा दिवसांचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. चित्रपट मराठी असला तरी मी ‘गीता बाली’ची भूमिका करत असल्याने चित्रपटातील माझे संवाद हे हिंदीतच आहेत.
मी मुंबईचीच असल्याने मराठी संस्कृतीशी माझी जवळून ओळख आहे. मराठी मंडळींबरोबर अनेक वर्षे काम करते आहे. त्यामुळे मला मराठी समजते आणि बोलूही शकते. पण, जाहीर कार्यक्रमातून बोलताना आपल्या व्याकरणदृष्टय़ा काही चुका होतील का, अशी भीती मला सतत वाटते. त्यामुळे तेव्हा मी शक्यतो बोलत नाही. या अगोदर मराठी चित्रपट पाहिले आहे का?, या प्रश्नाला उत्तर देताना विद्या बालन हिने सांगितले, लहानपणी शाळेत असताना दूरदर्शनवर दाखविले जाणारे मराठी चित्रपट घरी आई पाहायची. त्यामुळे आईबरोबर मीही तेव्हा हे चित्रपट पाहिले आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे विनोदी चित्रपट खूप पाहिले. ‘माहेरची साडी’ हा चित्रपटही पाहिल्याचे आठवते. अलीकडच्या काही वर्षांतील मराठी चित्रपटांविषयी काय वाटते? यावर ती म्हणाली, मराठी चित्रपटांसाठी सध्या चांगले दिवस आले आहेत. वेगवेगळे विषय आणि आशयामुळे मराठी चित्रपट समृद्ध झाला आहे. मराठी चित्रपटातून मध्यमवर्गीयांचे सुख, दु:ख खूप चांगल्या प्रकारे मांडण्यात आले आहे. मध्यमवर्गीयांची मानसिकता मराठी चित्रपटांनी चांगल्या प्रकारे समजून घेतली आहे, असे मला वाटते.

गणेशोत्सव आवडता सण
माझ्या लहानपणापासून आमच्या घरी गणपती आणण्यात येतो. गणेशोत्सव हा माझा सगळ्यात आवडता सण आहे. आई-वडिलांच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी दीड दिवसांचा गणपती असतो. पूजा, आरती, प्रसाद आणि मोदक असे सगळे साग्रसंगीत केले जाते. गणपतीच्या दिवसात मी शक्यतो मुंबईत राहण्याचा प्रयत्न करते. लहानपणी आम्ही चेंबूरला राहात होतो. तिकडे गणेशोत्सव थाटात साजरा व्हायचा. आजूबाजूच्या लोकांकडे गणपतीत आरती आणि दर्शनाला आम्ही जायचो. गणेशोत्सवाच्या या दिवसात कधी एकदा अभ्यास पूर्ण करून गणपतीसाठी बाहेर पळतोय असे व्हायचे. आमच्या इथे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. यात सांस्कृतिक कार्यक्रमांपासून ते नृत्य स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, हौजी यांचा समावेश असायचा. मी आणि माझी बहीण आम्ही दोघीही या सगळ्यात उत्साहाने सहभागी व्हायचो. विसर्जनाच्या वेळी मात्र आम्हाला रडू यायचे आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत आम्ही मनाची समजूत काढायचो. माझा देवावर विश्वास, श्रद्धा आहे. सगळ्या देवांमध्ये मला गणरायाचे रूप जास्त भावते, असेही विद्याने सांगितले.

खेळीमेळीचे वातावरण
मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी सेटवर काम करताना काही फरक वाटतो का? यावर ती म्हणाली ‘एक अलबेला’च्या निमित्ताने मी पहिल्यांदाच मराठीत काम केले. हिंदीच्या तुलनेत मराठीतील वातावरण खेळीमेळीचे आणि घरगुती वाटते. मराठीत उगाचच ‘चिल्लमचिल्ली’ (आरडाओरड) होत नाही. प्रत्येकजण मिळून मिसळून आणि एकमेकांना सांभाळून घेऊन काम करत असतो. त्यामुळे मराठीत काम करताना मला खूप छान वाटले, मजा आली. ‘एक अलबेला’मध्ये ‘भोली सूरत दिलके खोटे’ आणि ‘शोला जो भडके’ ही दोन गाणी आहेत. मूळ ‘अलबेला’ चित्रपटात ज्या प्रकारे ही गाणी आहेत त्याच प्रकारे या गाण्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. गाण्यांचा आवाज मात्र नवा आहे.