बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन ही ‘एक अलबेला’ या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकतेचं या चित्रपटातील ‘शोला जो भडके’ हे गाणे लाँच करण्यात आले. त्यावेळी पत्रकार दिलीप ठाकूर यांनी विद्या बालनची घेतलेली मुलाखत:
डर्टी पिक्चरची सिल्क स्मिता व एक अलबेलाची गीता बाली साकारण्याच्या प्रवासातच मला सुचित्रा सेन व मीनाकुमारी या व्यक्तिरेखा साकारण्याबाबत विचारणा झाली पण त्याबाबत आताच काही मी सांगू शकत नाही असे विद्या बालन सांगत होती. एक अलबेलाच्या निमित्ताने विद्याची विशेष भेट घेतली तेव्हा ती मला सांगत होती.
विद्या पुढे म्हणाली सिल्क स्मिता साकारल्यावर मला विविध क्षेत्रातील दहा व्यक्तिमत्व साकारण्याबाबत विचारणा झाली पण त्याबाबत आताच काही मी सांगू शकत नाही. कारण आता क्रीडा क्षेत्रातीलही काही खेळाडूंवर चित्रपट निर्मिती वाढली आहे. अशा प्रकारच्या चरित्रपटांची वाटचाल स्वागतार्ह व आव्हानात्मक आहे. पण प्रेक्षकांना काही वेगळे पहायला मिळेल हे निश्चित. विद्याला विचारले गीता बाली साकारणे किती सोपे होते व किती अवघड ठरले? यावर विद्या सांगू लागली , माझ्या पतीच्या घरी ६०..७० जुन्या हिंदी चित्रपटाची मोठी पोस्टर असून ती आम्ही आलटून पालटून लावत असतो. पण त्यात अलबेलाचे पोस्टर कायम असते. कारण तो आमचा अतिशय आवडता चित्रपट आहे. त्यामुळे एक अलबेला मध्ये गीता बाली साकारण्यासाठी विचारणा झाली तेव्हा मी रोमांचीत झाले. अर्थात मेकअपमनने मी गीता बाली दिसावी यासाठी विशेष मेहनत घेतली. मराठी चित्रपटाचे काम खूप शिस्तबद्ध व आखीव पध्दतीने चालते असा चांगला अनुभव देखील आला. विद्याला मराठी भाषा कितपत येते व तिचे मराठी चित्रपट पाहणे कितपत आहे असे मी विचारता ती सांगू लागली मी या मुंबई मध्येच लहानाची मोठी झाले. सातवीपर्यंत मला शंभर गुणांचे मराठी होते. मला बरे मराठी बोलता येते. माझ्या नात्यांमध्ये महाराष्ट्रीयन आहेत. माझा कर्मचारी वर्ग मराठी आहे. मला मराठी कधीच परके वाटले नाही. मराठी चित्रपट देखिल मी पहात असते. कट्ट्यार काळजात घुसली मी पाहिलाय. मला अधूनमधून मराठी चित्रपटाबाबत विचारणा होते. पण माझे मराठी अधिकच सुधारले व. माझ्याच आवाजात डबिंग होऊ लागले की मी मराठी चित्रपटातून नक्कीच भूमिका साकारेन. विद्याचा या क्षेत्रात जाहिरातपटापासून वावर आहे. तिला आता किती व कसा बदल जाणवतो? यावर ती सांगू लागली आता हिंदी चित्रपटसृष्टीला वेळ व नियोजनता याचे खूपच महत्वाचे वाटू लागले आहे. पटकथा संवाद यापासून सगळेच कसे जबरदस्त हवे यावरचा कल वाढलाय. आपल्या चित्रपटसृष्टीचा विस्तार वाढलाय हे खूपच जाणवतय. अनेक प्रकारचे चित्रपट निर्माण होत असल्याने कलाकारापुढे चांगला पर्याय देखिल आहे. हा सगळाच बदल स्वीकारणे गरजेचे आहे व ते स्वागतार्ह देखिल आहे असे विद्या गप्पा संपवत म्हणाली.