बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याने रविवारी विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर लाँच आला. शेखर जोशी (सुबोध भावे), त्याची पत्नी समायरा जोशी (मुक्ता बर्वे) नित्या आणि नायशा या त्यांच्या दोन मुली यांच्या भोवती ही कथा फिरते. ट्रेलरची सुरुवातच ऑपरेशन थिएटरच्या एका दृश्याने होते. साडी नेसलेली, गजरा माळलेली मुक्ता ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पाठमोरी उभी असताना दाखवण्यात आली आहे. शेखर आणि समायराचं अरेंज मॅरेज झालेलं असतं पण कामाच्या रहाडगाड्यात अडकलेल्या शेखरला कुटुंबासाठी पुरेसा वेळच देता येत नाही. त्याउलट शेखरलाच कोणी समजून घेत नाही असं त्याला सतत वाटत असतं. पण या सगळ्यात समायराची ओढाताण होत असते, म्हणून ती अखेर घटस्फोट घेण्याचा विचार करते.

पण शेखर आणि समायराच्या आयुष्यात एक वेगळं वळण येतं. त्यांच्या १० वर्षांच्या मुलीला, नित्या जोशीला कर्करोग झाल्याचे स्पष्ट होते आणि त्या दोघांचं जगच बदलून जाते. अनेकदा आपण किती कणखर आहोत हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा आपल्याकडे कणखर होण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच पर्याय नसतो. कणखर होणं म्हणजे नक्की काय हे सांगणारा सिनेमा म्हणजे हृदयांतर…

आपण जे जगत आहोत ते किती अनमोल आहे याची किंमत आपल्याला त्या क्षणाला कधीच नसते. तो क्षण हातातून निसटून गेल्यानंतर आपल्याला त्याची खरी किंमत कळते. पण तो निसटून जाऊ नये यासाठी काय करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न हृदयांतर या सिनेमातून करण्यात आला आहे.

वाचा : भावनांना हात घालणाऱ्या ‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

हृदयांतरचा ट्रेलर नक्कीच या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणारा आहे. हृतिक रोशन पहिल्यांदा मराठी सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम करत आहे. पण तरीही तो या सिनेमात मराठी बोलताना दिसणार नाही, त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही निराशाजनकच बाब असेल. शिवाय संपूर्ण ट्रेलरमध्ये हृतिक कुठेच दिसत नाही. तो दिसतो ते फक्त शेवटच्या काही सेकंदांसाठी.

‘दोन माणसांना कधी कधी दूर व्हावं लागतं पुन्हा स्वतःला शोधण्यासाठी… हृदयांतर होण्यासाठी…’ असे सिनेमातले काही संवादही फार आकर्षक आहेत. ट्रेलर बघून झाल्यानंतरही ते अनेकदा मनात घोळत राहतात. मुक्ता आणि सुबोध नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ती एक अनोखी ट्रीट असणार आहे यात काही शंका नाही. याआधी ‘एक डाव धोबीपछाड’ या सिनेमात ते एकत्र दिसले होते.

विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर’चा सिनेमा याआधी ९ जूनला प्रदर्शित होणार होता. पण, आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून ७ जुलै करण्यात आली आहे.