गेल्या बऱ्याच दिवसांपासून काजोल आणि धनुष स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळत होतं. याच उत्साही वातावरणात त्यांच्या आगामी ‘व्हीआयपी २ ललकार’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. पण, बऱ्याचजणांना खरी प्रतिक्षा लागून राहिली होती ती म्हणजे या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरची. याच वातावरणाचा अंदाज घेत ‘व्हीआयपी २’ चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा ट्रेलर शेअर केला.

‘वंडरबार फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून काजोलचा कधीही न पाहिलेला मॉडर्न कॉर्पोरेट लूक पाहायला मिळत आहे. त्यासोबतच संवाद हे या ट्रेलरची जमेची बाजू ठरत आहेत. ‘वंडरबार स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनलवरही हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्यासाठी सुरु असणारी ओढाताण, आपलं आणि कंपनीचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी न्यू कमर्सवर एखादी बॉस कशा प्रकारे नियंत्रण ठेवत असेल याचं चित्रण काजोलच्या भूमिकेतून पाहायला मिळत आहे. तर आपल्या वरिष्ठांना काही बाबतीत न जुमानता विविध आव्हानांचा स्वीकार करणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका साकारली आहे. लुंगी, सूट- बूट, दाक्षिणात्य अंदाज आणि त्यातच अनोखा कॉर्पोरेट बाज अशा भूमिकेत धनुष व्हीआयपीच्या ट्रेलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुख्य म्हणजे अफलातून स्टंट्सची झलकही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

चित्रपटाची कथा आणि संवाद धनुषने लिहिले असून, सौंदर्या रजनीकांतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. धनुष आणि काजोलच्या अभिनयाची जुगलबंदी या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘व्हीआयपी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा ‘व्हीआयपी २ ललकार’ हा सिक्वेल आहे. तेव्हा आता हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.