अल्पावधीत क्रिकेट विश्वात आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारा विराट कोहली फक्त मैदानावरच नाही तर आता सोशल मीडियावरही आपली कमाल दाखवू लागला आहे. फेसबुकवरील त्याच्या चाहत्यांचा आकडाही नावाप्रमाणेच विराट बनलाय. मैदानावर ज्याप्रमाणे विराट आपल्या खेळीने विक्रम रचतो, तसाच फेसबुकवरही त्याने एक नवा विक्रम रचलाय. फेसबुकवर विराटचे तब्बल 3 कोटी 57 लक्ष 25 हजार सातशे एकोणीस फॅन बनले आहेत. यामध्ये त्याने बॉलिवूडचा ‘सुलतान’ सलमान खान, ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोणलाही मागे टाकले आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडचा ‘शहनशाह’ अमिताभ बच्चन यांच्याही फेसबुक फॅनच्या आकड्यांना विराटने मागे टाकले आहे. युवा पिढीसोबतच विराटच्या चाहत्यांमध्ये लहानांपासून मोठ्यांचा समावेश आहे. विराट कोहली तर तरुणींच्या मनातील ताईत बनला आहे.

भारतातील सर्वाधिक फेसबुक चाहत्यांच्या टॉप टेन यादीमध्ये अभिनेत्री माधुरी दिक्षित, बिग बी, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण, सलमान खान यांचा समावेश आहे. बॉलिवूडच्या या सर्व दिग्गज कलाकारांना विराटने मागे टाकले आहे. यामध्ये सलमान खानचे 3 कोटी 51 लक्ष सोळा हजार नऊशे चोवीस फेसबुक चाहते, दीपिका पदुकोणचे 3 कोटी 40 लक्ष 48 हजार दोनशे चाहते आणि प्रियांका चोप्राचे 3 कोटी 17 लक्ष 26 हजार तेवीस फेसबुक चाहते आहेत. विराटने या बॉलिवूडमधील दिग्गजांसोबतच रॅपर हनी सिंग, गायिका श्रेया घोषाल आणि विनोदवीर कपिल शर्माला मागे टाकले आहे.

विराटप्रमाणेच सोशल मीडियाचे सुपरस्टार बनले आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींचे फेसबुकवर जवळपास 4 कोटी 22 लक्ष इतके चाहते आहेत. फेसबुकवर चाहत्यांकडून भरभरून मिळणाऱ्या या प्रेमामुळे विराटच्या अनेक पोस्टवर मिळणाऱ्या लाईक्सचा आकडा आश्चर्यचकित कऱणारा आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर विराटने पाकिस्तानच्या खेळाडूंना शुभेच्छा देणारा फोटो फेसबुकवर शेअर केला. या फोटोला तब्बल 8 लक्ष 96 हजार लाईक्स मिळाले आहेत. तर 21 जून रोजी विराटने आपला एक फोटो शेअर केला ज्याला 7 लक्ष 32 हजार लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर विराट चाहत्यांसोबत प्रत्येक लहानमोठी गोष्ट शेअर करताना दिसतो. त्याचे चाहतेसुद्धा प्रत्येक पोस्टला उत्स्फुर्त प्रतिसाद देताना दिसतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट, नवीन हेअरस्टाईल, मैदानावरील आणि मैदानाबाहेरील फोटो विराट फेसबुकवर नित्यनियमाने शेअर करत असतो.

ग्राफिक सौजन्य- सोशल बेकर्स
ग्राफिक सौजन्य- सोशल बेकर्स

विराटचे असंख्य चाहते केवळ भारतातच नसून भारताबाहेरही तितकेच आहेत. पाकिस्तानमध्येही कोहलीचे फेसबुकवर 1 कोटी 7 लक्ष 2 हजार 844 चाहते आहेत. हा आकडाच विराटची पाकिस्तानमधील लोकप्रियता दर्शवतो आहे. सीमापार चाहत्यांकडून विराटला मिळणारे हे प्रेम प्रशंसनीय आहे. बांगलादेश, नेपाळमध्येही विराटचे फेसबुकवर असंख्य चाहते आहेत.

image-1

 

बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच क्रिकेटचीही लोकांमध्ये खूप क्रेझ आहे. सलमान खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि बिग बी यांच्या चाहत्यांचा आकडाही तेवढाच मोठा. सोशल मीडिया साईट्सवर नजर टाकली असता सिनेसृष्ट्रीतल्याच अनेकांची नावे अव्वल स्थानावर दिसतात. मात्र फेसबुकसारख्या सोशल मीडियावर त्यांनाही हरवत विराट कोहलीने एक नवा विक्रम रचलाय असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्या नावाला साजेसे चाहत्यांचे ‘विराट’ प्रेम मिळवत कोहली फेसबुकचा ‘किंग’ ठरला आहे.