गायक आणि संगीतकार विशाल ददलानी याने राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हा निर्णय का घेतला असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच्या या निर्णयाचे मुख्य कारण आहेत ते म्हणजे अरविंद केजरीवाल. ददलानी याने जैन मुनी तरुण सागर महाराज यांच्यावर एक ट्विट केले होते. हे ट्विट केजरीवाल यांना फारसे आवडले नाही. ददलानी याने अशा प्रकारचे ट्विट करु नये असेही केजरीवाल यांनी सांगितले. या ट्विटला घेऊन विशालला अनेक टिकांना सामोरे जावे लागले होते. त्याच्या ट्विटची अनेकांनी नंतर खिल्लीही उडवायला सुरुवात केली. विशाल ददलानी याने हरियाणा विधानसभेत जैन मुनी तरुण सागर महाराज यांच्या प्रवचन देण्याच्या मुद्द्यावर ट्विट केले होते. त्याच्या या ट्विटवर वाद झाल्यानंतर त्याने हे ट्विट काढून टाकले होते. या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते की, ‘तुम्ही जर यांना मतदान केले असेल तर त्यांच्या या वायफळ बडबडीला तुम्हीच जबाबदार आहात.’
त्याच्या या ट्विटनंतर लोकांनी ददलानीची खिल्ली उडवायला सुरुवात केली. या ट्विटवर त्याने माफीही मागितली. तरुण सागरजी महाराज हे केवळ जैन धर्मियांसाठीच नाही तर इतर लोकांसाठीही पूजनीय संत आहेत. जे लोक त्यांचा अपमान करत आहेत त्यांनी हे त्वरित थांबवले पाहिजे, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले. विशालने त्यांचे हे ट्विट रिट्विट करत त्यांच्या या ट्विटबद्दल माफी ही मागितली. तो म्हणाला, ‘ज्या लोकांच्या भावना मी दुखावल्या असतील त्यांची मी माफी मागतो. पण भारताच्या हितासाठी राजकारण आणि धर्म या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत.’
विशालच्या या वक्तव्यावर दिल्लीचे आरोग्य आणि ऊर्जा मंत्री सत्‍येंद्र जैन यांनीही माफी मागितली. ‘माझा मित्र विशाल ददलानीच्या वतीने जैन समुदायच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. मी मुनी तरुण सागरजी महाराज यांची क्षमा मागतो.’ असे ट्विट सत्‍येंद्र जैन यांनी केले. ददलानी याने केजरीवाल आणि जैन यांचीही माफी मागितली. ‘मला फार वाईट वाटत आहे की मी माझे जैन मित्र, अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्या भावना दुखावल्या. यामुळे मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.’

dadlani-tweet