विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाने बुधवारी पाकिस्तानी गायक शफाकत अमानत अली यांचा बंगळुरूतील नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज पत्र लिहून पोलिसांना यासंबधीची विनंती केली. येत्या ३० सप्टेंबरला बंगळुरूमध्ये शफाकत अमानत अली यांचा कार्यक्रम होणार आहे. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना २५ सप्टेंबरपर्यंत भारत सोडून जाण्याचा आदेश दिला होता. यांनी २५ सप्टेबंरपर्यंत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल असा इशाराही मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला होता. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने गुपचूप भारत सोडल्याची चर्चा आहे. दरम्यान, आगामी  ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात फवाद खानची भूमिका असल्याने मनसेने या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही विरोध केला आहे. दरम्यान, आता या वादात सलमान खानने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचेही वृत्त आहे. त्यासाठी सलमान खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे कळते. सलमान आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्याने राज यांना फोन करून ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट अडथळ्याविना प्रदर्शित व्हावे अशी विनंती केल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने दिली आहे. जर हे वृत्त खरे असेल तर यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.